स्वच्छ महाविद्यालय म्हणून विद्या प्रतिष्ठानला राष्ट्रीय पातळीवर द्वितीय क्रमांक

मिलिंद संगई
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विद्यापीठ, महाविद्यालय, शासकीय महाविद्यालय, तंत्रशिक्षण देणा-या संस्था व जिल्हाधिकारी स्तरावर प्रत्येक जिल्ह्यातील एक गाव दत्तक घेऊन त्याची स्वच्छता अशा पाच विभागातून हे पुरस्कार देण्याचे घोषित केले होते. 

बारामती : येथील विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाला स्वच्छ महाविद्यालय म्हणून राष्ट्रीय पातळीवर द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. सुमारे चाळीस हजार महाविद्यालयांमधून बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या महाविद्यालयास द्वितीय क्रमांक प्राप्त झाल्याने विद्या प्रतिष्ठानच्या नावलौकीकात या निमित्ताने भर पडली.

गुरुवारी नवी दिल्ली येथे झालेल्या शानदार समारंभात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन महाविद्यालयाला गौरविण्यात आले. विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त सुनेत्रा पवार व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी संस्थेच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. 

महाविद्यालय विभागामध्ये बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने बाजी मारत थेट दुस-या स्थानावर झेप घेत हा सन्मान पटकाविला. देशभरातून सुमारे चाळीस हजार महाविद्यालयांनी प्रारंभी यात सहभाग नोंदविला. त्या नंतर साडेतीन हजार महाविद्यालयांनी यात ऑनलाईन सहभाग घेतला. त्यातून शासनस्तरावर 174 महाविद्यालयांची अंतिम यादी तयार करण्यात आली होती. 
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समितीने देशभरातील या 174 महाविद्यालयांची यादी तयार करुन अंतिम दहा महाविद्यालयांची निवड केली. यातून विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयास दुस-या क्रमांकाचे गुण मिळाल्याने त्यांना गौरविण्यात आले. 
स्वच्छतेचे उपाय, सांडपाण्याचा केला जाणारा पुर्नवापर, पाण्याचा पुरेसा पुरवठा, विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत घेतली जाणारी काळजी असे निकष लावण्यात आले होते. या समितीने तटस्थ पाहणी करत आपला अहवाल सादर केला, त्या अहवालावरुन महाविद्यालयास हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विश्वस्त सुनेत्रा पवार यांच्यासह उपाध्यक्ष अँड. ए.व्ही. प्रभुणे, सचिव द.रा. उंडे, खजिनदार रमणिक मोता, विश्वस्त अँड. नीलीमा गुजर, डॉ. राजीव शहा, श्रीकांत सिकची, रजिस्ट्रार कर्नल (निवृत्त) श्रीश कंभोज यांचे मार्गदर्शन व विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या सहकार्यामुळे हा पुरस्कार मिळाल्याचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी नमूद केले. 

Web Title: pune marathi news baramati vidya pratishthan second cleanest college