Pune: मार्केटयार्ड रविवारपासून बंद करण्याचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

market yard
मार्केटयार्ड रविवारपासून बंद करण्याचा इशारा

पुणे : मार्केटयार्ड रविवारपासून बंद करण्याचा इशारा

मार्केट यार्ड : बाजार समितीने खरेदीसाठी येणाऱ्‍या तीन चाकी वाहनासाठी ५० रुपये, चार चाकी वाहनासाठी १०० पार्किंग शुल्क घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला बाजारातील अडते, टेम्पो संघटना, कामगार संघटना आणि खरेदीदारांनी विरोध केला आहे. निर्णय शुक्रवार (ता.१९) पर्यंत रद्द न केल्यास येत्या रविवार (ता. २१) पासून बाजार बंद ठेवण्याचा निर्णय या सर्व घटकांनी घेतला आहे.

बाजारातील विविध संघटना, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील किरकोळ खरेदीदारांची संयुक्त बैठक मंगळवारी प्रशासक मधुकांत गरड यांच्यासमवेत पार पडली. यात पार्किंग शुल्क आकारणीबाबत चर्चा झाली. मात्र त्यावर तोडगा न निघाल्याने सर्व घटकांनी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत पिकअप वाहन चालक सागर चोपडे म्हणाले, ‘‘वाराई आता डागाप्रमाणे सुरू केली आहे. संपूर्ण वाराई ४८० रुपये झाली. मी आधी त्यांना २२० रुपये वाराई देत होतो. तसेच बाजार समितीने १०० रुपये पार्किंग शुल्क आकारले आहे. त्यामुळे हे मला परवडत नाही. वारणार आधी माल व्यवस्थित लावत होते. तसेच मालक चोरी जाण्याची जबाबदारीही घेत होते. त्यांच्या सोयीनुसार ते गाडी पार्किंगही करत होते. परंतु आज मला गाडी लावण्यास खूप त्रास झाला.’’
या बैठकीत गरड यांच्यासह फळविभाग प्रमुख बाबासाहेब बिबवे, भाजीपाला विभागप्रमुख दत्तात्रेय कळमकर, अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, उपाध्यक्ष अमोल घुले, सचिन पायगुडे, राजेंद्र कोरपे, टेम्पो संघटनेचे अध्यक्ष संतोष नांगरे, राजू रेणुसे, कामगार संघटनेचे विजय चोरगे, नितीन जामगे, विलास थोपटे, संजय साष्टे, तोलणार संघटनेचे राजेंद्र चोरगे, खरेदीदार सुनील शिंदे, देवेंद्र कोळेकर, भागवत बिराजदार, नागनाथ कोठावळे यांच्यासह खरेदीदार, टेम्पो चालक, अडते, व्यापारी, कामगार उपस्थित होते.

कशासाठी घेणार पार्किंग शुल्क?
फळे, भाजीपाला विभागातून दररोज एक हजार ते पंधराशे टेम्पोमधून शेतीमालाची आवक होते. हा माल खरेदीसाठी शहर, उपनगर, ग्रामीण आणि शेजारच्या जिल्ह्यांतून तब्बल तीन ते चार हजार वाहने दररोज मार्केट यार्डात येतात. तीन चाकी आणि चार चाकी टेम्पोकडून अनुक्रमे १०० ते २५० रुपये कसलीही पावती न देता पार्किंग आणि वाराईच्या नावावर वसुल करत असल्याचे बाजार समिती प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. ही प्रथा मोडीत काढण्यासाठी वाहतुकीसाठी अडथळा निर्माण न होता पार्किंगला जागा उपलब्ध करून देऊन तीनचाकींसाठी ५० आणि चारचाकीसाठी १०० रुपये (प्रती दोन तास) आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करून पार्किंग शुल्क
आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाजार समितीचे परवानाधारक हमाल पावती देऊन ही रक्कम स्वीकारणार असल्याची माहिती मधुकांत गरड यांनी दिली.

पार्किंग शुल्काचा निर्णय रद्द करण्याची विनंती आम्ही बाजार समिती प्रशासनाला केली आहे. प्रशासनाने निर्णय रद्द न केल्यास आमचा बंद कायम असणार आहे. बाजारात खरेदीसाठी येणारा टेम्पो चालक सेस, लेव्ही आणि आडत भरत असतो. असे असतानाही पुन्हा त्यासाठी अतिरिक्त पार्किंग शुल्क आकारणे चुकीचे ठरेल.
- विलास भुजबळ,
अध्यक्ष, अडते असोसिएशन

टेम्पोच्या पार्किंग शुल्काबाबत चर्चा करण्यासाठी बुधवारी मधुकांत गरड यांनी आडते, कामगार, व्यापारी प्रतिनिधींची बैठक बोलाविली आहे. या बैठकीत शुल्क आकारणीबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. यात सकारात्मक निर्णय झाल्यास पुकारण्यात आलेला बंद मागे घेण्यात येईल; अन्यथा बंद कायम असणार आहे.
- संतोष नांगरे,
अध्यक्ष, टेम्पो संघटना

loading image
go to top