हमालांच्या "काम बंद'चा परिणाम; तीनशे ट्रक जागेवर उभे 

हमालांच्या "काम बंद'चा परिणाम; तीनशे ट्रक जागेवर उभे 

मार्केट यार्ड - मार्केट यार्डातील भुसार बाजारात व्यापाऱ्यांनी तोलणारांना कामावर घेतले नसल्याच्या पार्श्वभूमीवर हमालांनी बुधवारी काम बंद ठेवले, त्यामुळे भुसार बाजारातील सर्व व्यवहार दिवसभर ठप्प राहिले. तेथे सुमारे 300 ट्रक जागेवर उभे होते. 

पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी 2014 मध्ये ज्या बाजार समित्यांमध्ये इलेक्‍ट्रॉनिक काटे वापरले जातात, तेथे पट्टीमधून तोलाई कपात करू नये, असे पत्र काढले होते. त्याला तत्कालीन पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्थगिती दिली. याविरोधात सांगली बाजार समितीमधील व्यापारी संघटनेने उच्च न्यायालयात दाद मागितली. त्यावर उच्च न्यायालयाने पणनमंत्र्यांनी दोन महिन्यांत निर्णय घ्यावा, असे आदेश दिले. विद्यमान पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी या पत्रावरील स्थगिती डिसेंबरमध्ये उठवत त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पणन संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. मात्र यावर अद्याप निर्णय झाला नाही. तो निर्णय येईपर्यंत तोलणारांना कामावर घ्यावे, असे आदेश बाजार समितीने दिले आहेत. तसेच तोलाई कपात करू नये, असेही देशमुख यांनी सांगितले आहे. 

बाजार समिती, दि पूना मर्चंट्‌स चेंबर आणि हमाल पंचायत यांची बुधवारी सायंकाळी बैठक झाली. यामध्ये ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, प्रशासक बी. जे. देशमुख, दि पूना मर्चंट्‌स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, माजी 

अध्यक्ष वालचंद संचेती, सचिव अशोक लोढा, हमाल पंचायतचे नवनाथ बिनवडे, माजी आमदार शरद ढमाले आदी उपस्थित होते. 

हमालांनी बुधवारी संध्याकाळी काम बंद आंदोलन मागे घेतले आहे, त्यामुळे आता उद्या (गुरुवार)पासून काम सुरळीत सुरू राहील. 
- बी. जे. देशमुख, प्रशासक, बाजार समिती 

हमालांनी कोणतीही पूर्वसूचना न देता एकतर्फी बाजार बंदचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे बाजारात बाहेरगावाहून आलेले सुमारे 300 ट्रक उभे राहिले. 
हमाल पंचायत व द पूना मर्चंट्‌स यांच्यातील करारानुसार कोणताही "बंद' करताना 48 तास अगोदर नोटीस देणे आवश्‍यक आहे. असे असताना हा बंद बेकायदा आहे. 
- पोपटलाल ओस्तवाल, अध्यक्ष, द पूना मर्चंट्‌स चेंबर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com