esakal | Pune : गणेशोत्सवानंतर मेट्रोचे गर्डर होणार पूर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : गणेशोत्सवानंतर मेट्रोचे गर्डर होणार पूर्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : संभाजी पुलावर मेट्रो मार्गासाठी गर्डर टाकण्याचे काम गणेशोत्सवानंतर पूर्ण होणार असल्याचे महामेट्रोने स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या निकषांनुसार हे काम होणार असल्यामुळे वाहतुकीला कोणत्याही प्रकारे अडथळा होणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

वनाज-रामवाडी मेट्रो मार्गाचे काम सध्या सुरू आहे. त्यातील वनाज-गरवारे महाविद्यालयादरम्यान पहिल्या टप्प्यातील काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या मार्गावर स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक ते डेक्कन जिमखाना बसस्थानकादरम्यान मेट्रो मार्ग नदीपात्रातून जाणार आहे.

त्यासाठी खंडुजीबाबा चौकात संभाजी पुलावरून मेट्रोचे मार्ग जाणार आहे. मात्र, या कामामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीला अडथळा येऊ शकतो, असा आक्षेप काही मंडळांसह राजकीय पक्षांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी तुर्तास ते काम थांबविण्याची सूचना केली आहे. त्यामुळे तेथे हे काम थांबविण्यात आले आहे.

हेही वाचा: Pune : मास्क न वापरणाऱ्यांवर महापालिकेची कारवाई

मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन खांबांपासून मेट्रो मार्गासाठी गर्डर टाकले जाणार आहेत. त्यांची रुंदी सुमारे २७ मीटर आहे. त्या आकाराचे गर्डर तयार करण्यात येत आहेत. स्टीलचे गर्डर तेथे आले आहेत. सिमेंटचे गर्डरही अल्पावधीत तयार होतील. पावसाचा जोर कमी झाल्यावर आणि गणेशोत्सवानंतर संभाजी पुलावर गर्डर टाकण्याचे काम पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय महामार्गाच्या निकषांनुसार काम

राष्ट्रीय महामार्गाच्या निकषांनुसार जमिनीपासून ५.५ मीटर उंचीपर्यंत वाहतुकीसाठी जागा लागते. त्यामुळे बोगद्यांचे काम होतानाही जमिनीपासून तेवढी उंची ठेवली जाते. राष्ट्रीय महामार्गांवर होणारी वाहतूक, मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची उंची, त्यांच्यात ठेवला जाणारा माल लक्षात घेऊन हे निकष ठरविण्यात आले आहेत. त्यानुसारच महामेट्रोचे काम सुरू आहे. संभाजी पुलावर जमिनीपासून सुमारे ६. ५ मीटर उंचीवर मेट्रो मार्गांसाठी गर्डर टाकले जाणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.

loading image
go to top