मेट्रो पुण्याच्याच नावाने

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

महापौरांच्या प्रशासनाला सूचना; अन्य नावाला मंजुरी नाही
पुणे - मेट्रो प्रकल्पाचे काम नागपूर मेट्रोला देण्यास भारतीय जनता पक्ष वगळता अन्य पक्षांच्या सदस्यांनी जोरदार विरोध केल्यानंतर मेट्रो प्रकल्प "पुणे मेट्रो रेल कॉर्पोरेशन' या नावानेच उभारावा, तसाच प्रस्ताव स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेपुढे मांडावा, अशी सूचना करीत अन्य नावाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात येणार नाही, असे महापौर प्रशांत जगताप यांनी बुधवारी महापालिका प्रशासनाला सांगितले.

महापौरांच्या प्रशासनाला सूचना; अन्य नावाला मंजुरी नाही
पुणे - मेट्रो प्रकल्पाचे काम नागपूर मेट्रोला देण्यास भारतीय जनता पक्ष वगळता अन्य पक्षांच्या सदस्यांनी जोरदार विरोध केल्यानंतर मेट्रो प्रकल्प "पुणे मेट्रो रेल कॉर्पोरेशन' या नावानेच उभारावा, तसाच प्रस्ताव स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेपुढे मांडावा, अशी सूचना करीत अन्य नावाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात येणार नाही, असे महापौर प्रशांत जगताप यांनी बुधवारी महापालिका प्रशासनाला सांगितले.

दरम्यान, मेट्रो उभारण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या भूमिकेचा निषेध करीत, महापालिकेची सर्वसाधारण सभा बहुमताने तहकूब करण्यात आली.

या तहकुबीला भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी विरोध केला.
केंद्रीय सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने (पीआयबी) मेट्रोला परवानगी दिल्यानंतर हा प्रकल्प उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यातच पुणे मेट्रोचे काम नागपूर मेट्रोला देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्री दुजाभाव करीत असून, नागपूर मेट्रोला काम देण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेने विरोध केला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही त्याचे पडसाद उमटले. सभेचे कामकाज सुरू होताच, पुणे मेट्रोचे काम नागपूर मेट्रोला देण्यास सदस्यांनी विरोध केला. राज्य सरकार मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.

विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे म्हणाले, 'मेट्रो प्रकल्प उभारण्यासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. तिच्या माध्यमातून काम करता येणार आहे.

त्यामुळे नागपूर मेट्रोला काम देण्याचा प्रश्‍न येत नाही; परंतु राज्य सरकार पुणे शहरावर अन्याय करीत असून, हे काम अन्य कोणत्याही कंपनीला देऊ नये.''

'नागपूर मेट्रोच्या माध्यमातून हे काम करण्याचा कोणताही आधार नाही. राज्य सरकार फसवणूक करीत आहे. त्यांचा मनमानी कारभार रोखावा,'' असे किशोर शिंदे यांनी सांगितले.

'मेट्रोबाबत प्रस्ताव तयार करताना पुण्याच्या नावानेच करावा. त्याच प्रस्तावाला मंजुरी दिली जाईल. अन्य कोणत्याही नावाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात येणार नाही, असे महापौरांनी सांगितले. त्याला सदस्यांनी बाके वाजवून पाठिंबा दिला. नागपूर मेट्रोला काम देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचा निषेध करून सर्वसाधारण सभा तहकूब करण्याचा ठराव मांडण्यात आला. त्याला भाजपच्या सदस्यांनी विरोध केला. यानंतर 61 विरुद्ध 12 मतांनी ठराव मंजूर झाला.

"ते' फलक काढले जातील
मेट्रो प्रकल्पाला "पीआयबी'ची मंजुरी मिळाल्यानंतर शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारचे अभिनंदन करणारे फलक उभारले आहेत. त्यावर आक्षेप घेत फलकांवर कारवाई करण्याची मागणी विविध पक्षांच्या सदस्यांनी सभागृहात केली. ते काढले जातील, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title: pune metro project