
पुणे : हिंजवडी - शिवाजीनगर मेट्रोच्या कामगारांसाठी टाटा समूहातर्फे ताथवडे येथे एक सुसज्ज निवासी वसाहत स्थापन करण्यात आली आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रो लाइन ३ चे काम ‘पीएमआरडीए’तर्फे सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर टाटा समूहाने हाती घेतले असून त्याच्या कार्यान्वनासाठी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याअंतर्गत पुणे मेट्रो लाइन ३ च्या उभारणीसाठी टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड (टीपीएल) ची कंत्राटदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे मेट्रो लाइन ३ च्या कामगारांसाठी टीपीएल कंपनीच्या वतीने ताथवडे कास्टिंग यार्ड येथे कामगार वसाहत स्थापन करण्यात आली आहे. ही वसाहत म्हणजे पत्र्याच्या खोल्या किंवा तात्पुरती शेड नसून सुसज्ज वसाहत आहे. पक्क्या बांधकामाच्या स्वरूपात निर्माण करण्यात आलेल्या या वसाहतीमध्ये एकूण ७०० कामगारांची निवाऱ्याची, विश्रांतीची आणि भोजनाची सोय करण्यात आली आहे. प्रकल्पावर काम करणाऱ्या कामगारांच्या भोजनासाठी येथे सुसज्ज स्वयंपाकघर आणि भोजनालय बांधण्यात आले आहे. तसेच कामगारांचे आरोग्य जपण्यासाठी परिसर स्वच्छता, शौचालये, सांडपाणी नियोजन याकडेही कटाक्षाने लक्ष पुरविले जात आहे. कामगारांच्या वैद्यकीय गरजांकडे तातडीने लक्ष पुरवण्यासाठी दोन एमडी डॉक्टरांची २४ तास नियुक्ती करण्यात आलेली आहे.
सुरक्षितता, आरोग्याला प्राधान्य
‘‘प्रकल्प वेळेत आणि उत्तम प्रकारे पूर्ण व्हावा यासाठी आमचे कामगार अखंड मेहनत घेत आहेत. त्यासाठी ही पक्की वसाहत उभारण्यात आलेली आहे. प्रकल्पाच्या सर्वच टप्प्यांत सुरक्षितता, स्वच्छता आणि आरोग्य याबाबत कुठलीही तडजोड न करण्याचे धोरण आम्ही अवलंबित आहोत,’’ अशी माहिती पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर यांनी दिली.