esakal | ग्राहकाच्या मृत्युनंतर बॅंक खात्यातील चोरले पैसे; विमानतळ पोलिसांकडून बँक अधिकाऱ्यांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

ग्राहकाच्या मृत्युनंतर बॅंक खात्यातील चोरले पैसे; विमानतळ पोलिसांकडून बँक अधिकाऱ्यांना अटक

ग्राहकाच्या मृत्युनंतर बॅंक खात्यातील चोरले पैसे; विमानतळ पोलिसांकडून बँक अधिकाऱ्यांना अटक

sakal_logo
By
पांडुरंग सरोदे : सकाळ वृत्तसेवा

पुणे : वृद्ध बॅंक खातेदाराच्या मृत्युनंतर त्यांच्या बॅंक खात्यातील सव्वा दोन लाख रुपयांची रक्कम बॅंकेतील अधिकाऱ्यांनी काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी विमाननगर येथील इंडसंड बॅंकेच्या दोन अधिकाऱ्यांना अटक केली. जुबेर गांधी (वय 34, रा. विमाननगर), अंकीता रंजन (वय 30, रा. विमाननगर) असे अटक केलेल्या संशयित आरोपींचे नाव आहे. याप्रकरणी चंद्रशेखर राजगोपालन (रा. विमाननगर) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजगोपालन यांच्या वडीलांचे विमाननगर येथील इंडसंड बॅंकेमध्ये बचत खाते आहे. फिर्यादीचे वडील वृद्धत्व व आजारी असल्याने बॅंकेच्या रिलेशनशीप मॅनेजर असलेल्या अंकीता रंजन व शाखा व्यवस्थापक जुबेर गांधी असे दोघेजण फिर्यादीच्या घरी जाऊन त्यांना बॅंक व्यवहार करण्यासाठी आवश्‍यक मदत करीत होते. 10 मार्च रोजी फिर्यादीच्या वडीलांचे निधन झाले. त्यानंतर फिर्यादीच्या मोबाईलवर निपॉन इंडिया म्युच्युअल फंड प्रा. लि. या कंपनीचा मेसेज आला. त्यामध्ये 22 मार्च रोजी खातेदाराची सही बनावट असल्याने व्यवहार पुर्ण करता येणार नाही, असे नमूद केले होते. त्या मेसेजमुळे फिर्यादीस संशय आला. त्यानंतर त्यांनी बॅंकेत जाऊन संबंधीत अधिकाऱ्यांना फिर्यादीस आलेला मेसेज दाखविला. वडीलांचे निधन झाल्यानंतर असा मेसेज कसा येऊ शकतो, अशी विचारणा करीत त्यांनी वडीलांच्या बॅंक खात्याची सविस्तर माहिती घेतली. त्यावेळी त्यांना त्यांच्या वडीलांच्या बॅंक खात्यामध्ये केवळ चार हजार 596 रुपये शिल्लक असल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा: जावयाने सासूसोबतच मांडला संसार; बिनसल्यावर उचललं टोकाचं पाऊल

फिर्यादीचे वडील निधन झाल्यानंतर मुदत ठेव बंद करण्याकरीता फिर्यादीच्या वडीलांच्या सह्यांसारख्या सह्या करुन 24 मार्च रोजी त्यांच्या बॅंक खात्यातुन दोन लाख 37 हजार रुपये कोणीतरी काढून घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच फिर्यादीच्या वडीलांच्या बॅंक खात्याच्या केवायसीमध्ये बदल करण्याकरीता मुळ मोबाईल क्रमांकामध्ये बदल करून बॅंकेत झालेल्या व्यवहाराची माहिती मिळू नये, यासाठी आरोपींनी दुसऱ्या मोबाईल क्रमांकाचा वापर केला. निपॉन इंडिया म्युच्युअल फंड प्रा.लि. या कंपनीकडे सादर केलेला अर्ज हा फिर्यादीच्या वडीलांच्या निधनानंतर करण्यात आला होता. हा सर्व प्रकार इंडसंड बॅंकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बॅंकेतील अधिकारी असल्याचा गैरफायदा घेऊन केला असल्याची फिर्याद विमानतळ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. त्यानंतर विमानतळ पोलिसांनी इंडसंड बॅंकेच्या गांधी व रंजन यांना अटक केली. परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार, पोलिस निरीक्षक मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी सचिन जाधव या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

loading image