Pune : दुरुस्ती पथविभागाकडे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune : दुरुस्ती पथविभागाकडे?
Pune : दुरुस्ती पथविभागाकडे?

Pune : दुरुस्ती पथविभागाकडे?

पुणे : समान पाणी पुरवठ्यासाठी खोदाई केल्यानंतर ठेकेदाराकडून रस्त्याची दुरुस्ती निकृष्ट दर्जाची झाल्याने शहरातील रस्त्यांची वाट लागली आहे. याची उपरती झालेल्या प्रशासनाने रस्ते बुजविण्याच्या धोरणात बदल करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पाणीपुरवठ्याच्या कामासाठी शहरात अजून किमान १,१५० किलोमीटरची खोदाई शिल्लक आहे, हे रस्ते पथ विभागाकडून बुजवून घेतले जाणार आहेत. यासाठी सुमारे १०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा: तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाला हिंसक वळण; तहसीलदाराची गाडी पेटवली

महापालिकेने २,१०० कोटी रुपयांची समान पाणीपुरवठा योजना दोन वर्षांपूर्वी सुरू केली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये या योजनेचे काम बाजूला ठेवत सुमारे ५० किलोमीटर लांबीची जलवाहिनी शहराच्या मध्यवर्ती भागासह इतर भागात टाकली. समान पाणी पुरवठ्याचे काम ‘एल अँड टी’ कंपनीकडून सुरू असून, टाक्या बांधणे, जलवाहिनी टाकणे, पाण्याचे प्रेशर योग्य आहे की नाही हे तपासणे, योग्य त्या ठिकाणी वॉल्व बसवणे यासह कामे व खोदलेले रस्ते सिमेंट काँक्रिट टाकून पुर्ववत करण्याची जबाबदारी कंपनीवर आहे. ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडली जात नसल्याने खड्डे बुजविण्याच्या कामापासून पथ विभागाने अंग काढून घेतले आहे.

जलवाहिनी टाकल्यानंतर खड्डा बुजविताना खडी टाकून, व्यवस्थित दबाई करून त्यावर सिमेंट काँक्रिट टाकणे अपेक्षीत होते. मात्र बहुतांश ठिकाणी फक्त माती टाकून खड्डा बुजविला आहे, तर काही ठिकाणी खडी न टाकता काँक्रिटीकरण केले. त्यामुळे ठिकठिकाणी रस्ते खचल्याने वाहनचालकांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी रस्त्यांची दुर्दशा कशा पद्धतीने झाली याची पाहणी केली. त्यामुळे जागे झालेल्या प्रशासनाने आता पालिका प्रशासनाने कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून पुढील दीड महिन्यात सर्व रस्ते दुरुस्त होतील अशी भूमिका स्पष्ट केली आहे.

हेही वाचा: रोहित-द्रविड पर्वात टीम इंडियाने जिंकली पहिली मालिका

येऊ शकते तांत्रिक अडचण

समान पाणीपुरवठा योजनेच्या २,१०० कोटींच्या कामात खर्चात खड्डे बुजविण्याची रक्कमही आहे. त्यामुळे ठेकेदाराची रक्कम काढून घेऊन ती पथ विभागाला द्यावी लागणार आहे. त्यास ठेकेदार तयार न झाल्यास या धोरणात्मक बदलास तांत्रिक अडचण येऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.

असा होईल फायदा

‘एल अँड टी’ कंपनीकडून रस्ते दुरुस्ती व्यवस्थित होत नसल्याने हे काम पथ विभागाकडे देण्यावर प्रशासनाची चर्चा सुरू आहे. रस्ते दुरुस्ती, खड्डे भरणे यासाठी पथ विभागाकडे योग्य पद्धतीने काम करणारे लोक आहेत. त्यामुळे हे काम हस्तांतरित करावे, यासाठी पथ विभागानेही तयारी दाखवली. समान पाणीपुरवठा योजनेसाठी १,७०० किलोमीटर लांबीचे रस्ते खोदावे लागणार आहेत, त्यापैकी सुमारे ५५० किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. आणखी १,१५० किलोमीटरची रस्ते खोदाई भविष्यात केली जाणार आहे. हे काम पथ विभागाला दिल्याने विभागावर रस्त्याचे उत्तरदायित्वही असेल.

loading image
go to top