Mula Mutha River : मुळा-मुठा नदी काठ सुधारच्या कामाची गती मंदावली

नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत मुळा-मुठा नदीचा काठ सुशोभित केला जाणार आहे.
Mula-Mutha-River
Mula-Mutha-RiverSakal

पुणे - बंडगार्डन ते मुंढवा या दरम्यानच्या नदी काठ सुधारच्या कामाचा गती मंदावली आहे. ऑगस्टअखेर पर्यंत २० टक्के काम पूर्ण होणे अपेक्षित असताना केवळ १२ टक्के काम झाले आहे. त्यामुळे आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी संबंधित ठेकेदाराचे कान टोचत कामाची गती वाढविण्याचे आदेश दिले आहेत.

नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत मुळा-मुठा नदीचा काठ सुशोभित केला जाणार आहे. यामध्ये सध्या संगमवाडी ते बंडगार्डन (३.७ किलोमीटर) आणि बंडगार्डन ते मुंढवा (५.३ किलोमीटर) असा नदी काठ सुशोभित करण्याचे काम सुरु आहे.

या कामासाठी अनुक्रमे २६५ कोटी आणि ६०४ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. नदी काठ सुधारचे काम सुरू झाल्यानंतर नेमके हे काम कसे असणार आहे याची कल्पना नागरिकांना यावी यासाठी महापालिकेने बंडगार्डन येथे ३०० मीटर अंतराचे काम प्राधान्याने पूर्ण केले आहे.

आयुक्त विक्रम कुमार यांनी आज महापालिकेचे अधिकारी, ठेकेदार यांची महापालिकेत बैठक घेतली. संगमवाडी ते बंडगार्डन या टप्प्याचे काम ३२ टक्के होणे अपेक्षीत होते, तेथे ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. पण बंडगार्डन ते मुंढवा या टप्प्याचे काम २० टक्के होणे अपेक्षीत असताना केवळ १२ टक्के काम पूर्ण झाले आहे.

संगमवाडी ते बंडगार्डन या कामासाठी सुमारे ४०० कर्मचारी, मजूर रोज कामावर आहेत, पण बंडगार्डन ते मुंढवा दरम्यान केवळ १३० जणांकडून काम करून घेतले जात असल्याचे बैठकीत निदर्शनास आले. त्यावर नाराजी व्यक्त करत आयुक्तांनी मनुष्यबळाची संख्या वाढवून काम वेगात करा, असे आदेश दिले आहेत, असे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी सांगितले.

राज्य सरकारने वृक्ष प्राधिकरणाच्या कायद्यात बदल करून वृक्षतोडीसंदर्भातील सरकारचा अधिकार महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. नदी काठ सुधारच्या कामासाठी झाडे तोडली जाणार असल्याने महापालिकेने त्यासाठी महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाकडे अर्ज केला होता.

पण आता कायद्यात बदल केल्याने हे अधिकार पुन्हा महापालिकेला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात या कायद्यातील तरतुदींचे पालन करून आयुक्त विक्रम कुमार हे निर्णय घेणार आहेत. दरम्यान या कामामध्ये सुमारे सात हजार झाडे तोडली जाणार आहेत. त्याबदल्यात महापालिका सुमारे ६० ते ६५ हजार झाडे लावणार आहे, असे खेमनार यांनी सांगितले.

‘महापालिका आयुक्तांनी आज नदी काठ सुधार प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला. बंडगार्डन ते मुंढवा टप्प्याचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे मनुष्यबळामध्ये वाढ करून कामाचा वेग वाढविण्याचे आदेश ठेकेदारास दिले आहेत. नदी सुधार योजनेचा तिसरा टप्पा असलेल्या बाणेर ते वाकड हा आठ किलोमीटरच्या कामासाठी निविदा काढली आहे, पण त्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.’

- डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com