Pune: मुळा नदीकिनारी डांबरीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुळा नदीकिनारी डांबरीकरण

पुणे : मुळा नदीकिनारी डांबरीकरण

जुनी सांगवी : ‘जुनी सांगवीत खड्ड्यांमुळे वाहनचालकांची कसरत, याबाबत ‘सकाळ’मध्ये बातमी प्रसिद्ध करण्यात आली. या बातमीची दखल घेत नगरसेवक हर्षल ढोरे यांनी पाठपुरावा करून जुनी सांगवी येथील मुळा नदी किनारा रस्त्याचे महापालिका स्थापत्य विभागाकडून डांबरीकरण करण्यात आले आहे. दत्त आश्रम ते शितोळेनगर जोडरस्ता या रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाली होती.

अनेकदा खड्डे चुकविण्याच्या नादात नागरिकांना किरकोळ अपघाताच्या घटनांना सामोरे जावे लागत होते. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, मुळानगर येथे अर्ध्या रस्त्यात खड्डा पडला होता. समोरच झोपडपट्टी व अरुंद रस्त्यामुळे येथून रहदारी करणे जिकिरीचे झाले होते. या समोरील बाजूस सार्वजनिक नळ कोंडाळ्यावर पाणी भरण्यासाठी होणाऱ्या गर्दीलाही रहदारीचा त्रास सहन करावा लागायचा.

हेही वाचा: किवींचा पुन्हा ये रे माझ्या मागल्या शो; कांगारु टी-20 चॅम्पियन!

या रस्त्यावरून दापोडी, पुणे, औंधकडे ये-जा करण्यासाठी मोठी वर्दळ असते. रस्त्याच्या दुतर्फा किराणा मालाची दुकाने, भाजीची दुकाने, भंगार व्यावसायिकांची दुकाने असल्याने नागरिकांची या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. याचबरोबर या मार्गावरून पुणे व इतर भागात ये-जा करण्यासाठी पीएमपीएमएलची बस सेवा सुरू आहे. खड्डेमय रस्त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दुचाकीवरून प्रवास करताना कंबरदुखी, मणक्याचा त्रास असणाऱ्यांच्या त्रासात भर पडत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती.

दत्त आश्रम ते ढोरेनगर या भागातील रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. शिल्लक राहिलेले काम लवकरच पूर्ण करण्यात येईल.

- हर्षल ढोरे, नगरसेवक

loading image
go to top