द्रुतगती महामार्गावर  वेगमर्यादा ‘जैसे थे’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

पुणे - पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहनांसाठी वेगमर्यादा ताशी ८० किलोमीटरच ठेवण्याचे राज्य रस्तेविकास महामंडळाने (एमएसआरडीसी) तूर्तास ठरविले आहे. पावसाळा झाल्यावर म्हणजेच ऑक्‍टोबरनंतर याबाबत निर्णय घेण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. 

पुणे - पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहनांसाठी वेगमर्यादा ताशी ८० किलोमीटरच ठेवण्याचे राज्य रस्तेविकास महामंडळाने (एमएसआरडीसी) तूर्तास ठरविले आहे. पावसाळा झाल्यावर म्हणजेच ऑक्‍टोबरनंतर याबाबत निर्णय घेण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. 

द्रुतगती मार्गावरील वेगमर्यादा ताशी ८० किलोमीटरवरून १२० करता येईल, असा निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने ६ एप्रिल रोजी जाहीर केला आहे. परंतु त्याबाबतची अधिसूचना ‘एमएसआरडीसी’ने प्रसिद्ध करणे अपेक्षित आहे. त्यानंतरच या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकते. दरम्यान, द्रुतगती मार्गाच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ झाल्याशिवाय वेगमर्यादा वाढवू नये, असे मत व्यक्त केले आहे. वेगमर्यादेत वाढ करण्यासाठी ‘एमएसआरडीसी’ने समिती स्थापन केली आहे. या समितीच्या दोन बैठका यापूर्वी झाल्या आहेत. परंतु केंद्र सरकारच्या अधिसूचनेनंतर या समितीची बैठक अद्याप झाली नाही. वाहतूक मंत्रालयाने वेगमर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला असला, तरी द्रुतगती मार्गावर वळणांची संख्या जास्त आहे. तसेच, घाट विभाग आणि बोगदेही आहेत. पावसाळ्यात लोणावळा- खंडाळ- खोपोली दरम्यान पाऊस जास्त असतो व धुकेही असते, त्यामुळे या दरम्यान वाहतुकीचा वेग पावसाळ्यात मंदावतो. या रस्त्यावर जड वाहनांची वाहतूकही जास्त असते. या मुद्द्यांचा विचार समितीला करावा लागणार आहे. त्यानंतरच वेगमर्यादेत वाढ करण्याबाबत निर्णय घेता येईल, असे ‘एमएसआरडीसी’च्या सूत्रांनी स्पष्ट केले. 

निर्णय पावसाळ्यानंतर
केंद्र सरकारने वेगमर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला असला, तरी स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार राज्य सरकार निर्णय घेऊ शकते. त्यामुळे वेगमर्यादेत वाढ करण्याच्या निर्णयाबाबत पावसाळ्यानंतर निर्णय होईल, असे ‘एमएसआरडीसी’च्यावतीने सांगण्यात आले आहे. 

Web Title: Pune-Mumbai expressway