ग्लोबल होत असलेल्या पुण्याची माहिती आता महापालिकेच्या वेबसाईटवर

pune website
pune website

पुणे, ता. 18 ः जगाच्या नकाशावर झळकत असलेल्या आणि दिमाखदार परंपरा जपत आधुनिकतेकडे वाटचाल करीत बदलत असलेले पुणे हे एक टुरिस्ट डेस्टीनेशन म्हणून पुढे यावे, यासाठी "एक्‍सप्लोअर पुणे' हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक, शैक्षणिक, उद्योग आदी विविध क्षेत्रातील पुण्याची माहिती त्यावर नागरिकांना उपलब्ध होणार आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्या उपस्थितीत "एक्‍सप्लोअर पुणे' (explorepune.in) या संकेतस्थळाचे लोकार्पण महापालिकेत झाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून पुणे शहर हे जगभरामध्ये जोडले जाण्याचा हा एक अनोखा प्रयत्न आहे. ऐतिहासिक शहर, विद्येचे माहेरघर, माहिती-तंत्रज्ञानाचे शहर, ऑटो हब, वारसा स्थळं असणारे शहर, अशी पुण्याची बहुविध ओळख आहे. या पुण्याला जगामध्ये एक ब्रॅन्ड म्हणून साकारण्यासाठी पुणे महानगरपालिका व एज क्रीएटेक प्रायव्हेट लिमिटेड यांनी हे संकेतस्थळ तयार केले आहे.

कला-संस्कृतीचे माहेरघर असलेले हे पुणे आता विस्तारत आहे. आयटी, ऑटोमोबाईलपासून अनेक क्षेत्रांत पुण्याने उल्लेखनीय भरारी मारली आहे. त्यामुळेच कुठलाही पुणेकर कॅलिफोर्नियाच्या स्ट्रिटवर सहजपणे भटकताना दिसतो. म्हणूनच पुणं हे ग्लोबल व्हावं, यासाठी एक्‍सप्लोअर पुणे हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे, अशी माहिती "एज क्रीएटेक'चे संचालक योगेश रिसवाडकर यांनी दिली. उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृहनेते धीरज घाटे, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, साखर आयुक्त शेखर गायकवाड, रिसवाडकर, एज क्रीएटेकचे संचालक राहुल गोडसे, राहुल सोलापूरकर आदी या प्रसंगी उपस्थित होते.

पुण्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांचा विचार करून, या संकेतस्थळावर सर्व माहिती एकत्रित देण्यात येणार आहे. पुण्यातील वारसा स्थळं, ऐतिहासिक इमारती, खाद्यसंस्कृती, विद्यापीठं, शैक्षणिक संस्था, नाट्यसंपदा, उद्योगव्यवसाय, पुण्यातील कला, सोयी-सुविधा, आधुनिक पुणे, पुण्यातील सगळे सांस्कृतिक महोत्सव आदी विविध प्रकारची माहिती या संकेतस्थळावर असेल. पुण्यात एखाद्या ठिकाणी कसे जायचे, कुठे राहता येईल, काय पाहता येईल, अशा उपयुक्त गोष्टीही या संकेतस्थळावर असतील. त्याचा जगभरातील पर्यटकांनाच नव्हे तर, देश आणि राज्यातील पर्यटकांनाही मोठा उपयोग होईल आणि पुण्याकडे पर्यटकांचा ओघ वाढेल. नजीकच्या काळात explorepune याच नावाने मोबाईल ऍप्लिकेशन तयार करण्यात येणार असून, संकेतस्थळावर असणारी सगळी माहिती त्यामध्ये उपलब्ध होईल.

तसेच नकाशे, विविध ठिकाणचे बुकिंग, शहरात होणारे कार्यक्रम, अशा सुविधाही या ऍप्लिकेशनवर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरु आहे.यांशिवाय या संकेतस्थळावरील माहिती आणि ऍप्लिकेशनची माहिती सोशल मीडियाद्वारे देण्यात येणार असून त्यामुळे
जगभरातील पर्यटकांचा ओढा पुण्याकडे वाढेल.

पक्का पुणेकर माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी त्याचे पुण्याबद्दलचे प्रेम कधीच कमी होत नाही. त्यांच्या पुण्याबद्दलच्या आठवणी, अनुभव तसेच आपण मिळवलेले अतुलनीय यश "ग्लोबल पुणेकर' या सदरात असेल, अन परदेशातून पुण्यात येऊन स्थायिक झालेलेही पुण्याबद्दलची त्यांची आत्मियता येथे शब्दात व्यक्त करणार आहेत.

या संकेतस्थळावर "अस्सल पुणेरी' या कॉलममध्ये पुणेकराला त्याचा पुण्याबद्दलचा एक जाज्वल्य अभिमान दिसेल. त्याला नाविन्याचा ध्यास असतो. पेठा, आळ्या, गल्ल्या, शाळा, महाविद्यालये,ऑफिसेस, वैशिष्ट्यपूर्ण खाण्याचे अड्डे या बरोबरच पुणेरी पाट्या, पुणेरी नमुने, पुणेरी स्वभाव या बद्दलही या संकेतस्थळावर सगळं काही असेल अन थेट अस्सल पुणेरी भाषेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com