पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प ६ हजार कोटींचा

महापालिका भवन - महापालिकेचा प्रारूप अर्थसंकल्प गुरुवारी आयुक्त सौरभ राव यांनी स्थायी समितीला सादर केला. त्या वेळी अर्थसंकल्पावर नजर टाकताना (डावीकडून) योगेश मुळीक, महापौर मुक्ता टिळक,  डॉ. सिद्धार्थ धेंडे व श्रीनाथ भिमाले.
महापालिका भवन - महापालिकेचा प्रारूप अर्थसंकल्प गुरुवारी आयुक्त सौरभ राव यांनी स्थायी समितीला सादर केला. त्या वेळी अर्थसंकल्पावर नजर टाकताना (डावीकडून) योगेश मुळीक, महापौर मुक्ता टिळक, डॉ. सिद्धार्थ धेंडे व श्रीनाथ भिमाले.

पुणे - शहरात सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्याबरोबरच पाणीपट्टीत १५, तर मिळकतकरात १२ टक्‍क्‍यांनी वाढ सुचविणारा पुढील वर्षीचा (२०१९-२०) ६ हजार ८५ कोटी रुपयांचा प्रारूप अर्थसंकल्प गुरुवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्थायी समितीला सादर केला. चालू वर्षापेक्षा पुढील वर्षी उत्पन्नात तब्बल तीनशे कोटी रुपयांची वाढ प्रशासनाने अपेक्षित धरली आहे. त्यामुळे महापालिकेच्या अर्थसंकल्पाने प्रथमच सहा हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

करवाढीव्यतिरिक्त उत्पन्नवाढीचे कोणतेही ठोस उपाय प्रशासनाने या अर्थसंकल्पात सुचवलेले नाहीत. मिळकतकर, जीएसटी आणि बांधकाम विकास शुल्क हे पारंपरिक आर्थिक स्त्रोत सक्षम करून त्यातूनच उत्पन्न वाढेल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्‍त केली आहे. शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी रस्ते, सार्वजनिक वाहतूक, घनकचरा व्यवस्थापनाबरोबरच समान पाणीपुरवठा योजनेला चालना देण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. या वेळी महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्यासह विरोधी पक्षांचे सदस्य उपस्थित होते. आयुक्त पदाची सूत्रे घेतल्यानंतर राव यांनी पहिला अर्थसंकल्प मांडला.

जमेच्या बाजूला वस्तू व सेवा कराच्या माध्यमातून अनुदानातून १ हजार ८०८ कोटी, मिळकतकराच्या माध्यमातून १ हजार ७२१ कोटी, बांधकाम परवानगी व विकसन शुल्कातून ६६१ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे.  पाणीपट्टीतून ४५० कोटी, राज्य सरकारकडून अनुदानापोटी २३९ कोटी, इतर आणि कर्जरोख्यातून ८०२ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. 
समान पाणीपुरवठा योजनेला गती देण्यासाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच, येत्या वर्षभरात म्हणजे जानेवारी २०२० पासून कचरा डेपो टाकण्यात येणार नाही, याचे नियोजन केले आहे. सातवा वेतन आयोग लागू झाल्याने सेवक वर्गावरील खर्च १ हजार ६६५ कोटी रुपये अपेक्षित आहे.

भांडवली विकासकामांसाठी तब्बल २ हजार ५०० कोटींची तरतूद केली आहे. त्यापैकी साठ टक्के रक्कम सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी असल्याचे आयुक्त राव यांनी सांगितले. एकूण उत्पन्नाच्या ३९ टक्के रक्कम विकासकामांवर, तर २७ टक्के रक्कम सेवकवर्गावर खर्च धरण्यात आली आहे. हद्दीत समाविष्ट झालेली अकरा गावे, रिंगरोडच्या भूसंपादनासाठी नगर रचना योजना, एचसीएमटीआर, बस खरेदी, मेट्रो प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे.

ठळक तरतुदी
पाणी (५१३.८३ कोटी रु.)

  समान पाणीपुरवठा योजनेला गती (जलवाहिन्यांची कामे)
  भामाआसखेड प्रकल्प पूर्णत्वास नेणे

शिक्षण
(प्राथमिक : ३२९.२० कोटी रु., माध्यमिक : ५५.९ कोटी रु.) 

  पाच शाळांमध्ये ‘पीएमपी मॉडेल ऑफ एक्‍सलेन्स’ प्रकल्प
  शंभर व्हर्च्युअल क्‍लासरूम
  दोनशे शाळात डिजिट 
क्‍लासरूम
  शाळांमध्ये रोबोटिक्‍स लॅब, म्युझिक रूम
  नॅशनल स्किल क्वॉल्फिकेशन फ्रेमकर्व प्रकल्प

अशा आहेत तरतुदी
आरोग्य (२४६.२६ कोटी रुपये)
  बालकांसाठी तपासणी व निदान केंद्र 
  ज्येष्ठ नागरिकांसाठी डे-केअर सेंटर
  विविध तीन रुग्णालयांत डायलिसिस सेंटर
  पालकांसाठी समुपदेशन केंद्र
  भाजलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र वार्ड

नगरनियोजन
  पंतप्रधान आवास योजनेत २१ घरांची उभारणी
  महापालिकेच्या हद्दीसह २३ गावांमध्ये नगरनियोजन योजना (टी पी स्कीम)
  नव्या अकरा गावांमध्ये टी पी स्कीम 

घनचरा व व्यवस्थापन (८६.३६ कोटी रुपये) 
  शंभर टक्के कचरा प्रक्रियेसाठी यंत्रणा
  रामटेकडीतील ७५० टन क्षमतेचा प्रकल्प कार्यन्वित 
  पाचशे टन कचरा वर्गीकरण प्रकल्प
  भूगाव आणि फुरसुंगीत रॅम्प 

वाहतूक (२५२.९ कोटी रुपये)
  पीएमपीच्या ताफ्यात नव्या बसगाड्यांची खरेदी (ई-बस, सीएनजी)
  उच्च क्षमता वर्तुळाकार द्रुतगती मार्गाला गती
  बीआरटी मार्गाचे जाळे विस्तारणे
  सायकल मार्ग तयार करणे 
  सिंहगड रस्ता-धायरी फाटा वाय आकाराचा पूल
  पाषाण-सूस उड्डाण पूल 
  औंध- सांगवी रस्त्यावर पूल

पथ (५०३ कोटी रुपये) 
  शिवणे-खराडी रस्त्याला गती
  कात्रज-कोंढवा रस्त्याला प्राधान्य
  वर्दळीच्या रस्त्यांचा पुनर्विकास
  अपघात टाळण्यासाठी शंभर किलोमीटर रस्त्यांवर उपाय 
  प्रमुख रस्त्यांची सुरक्षिततेच्या दृष्टीने दुरुस्ती

उद्यान (९७.१२ कोटी रुपये)
  नव्या चार उद्यानांची उभारणी 
  वडगाव शेरीत दिव्यांगांसाठी अडथळाविरहित उद्यान 
  डहाणूकर कॉलनीत झाडांची माहिती देणारे उद्यान

भवन रचना (३६३.२ कोटी रुपये)
  बावधनमध्ये नवे अग्निशमन केंद्र 
  सिंहगडावर स्वराज्य शिल्पांची उभारणी
  बाणेरमध्ये आर. के. लक्ष्मण कलादालन
  कोथरूडमध्ये प्रदर्शन केंद्र

माहिती तंत्रज्ञान विभाग (३८.१८ कोटी रुपये) 
  डॅशबोर्ड (कार्यालयीन कामकाजातील पारदर्शकतेसाठी)
  दस्तऐवज स्कॅनिंग

हेरिटेज सेल 
  विश्रामबागवाडा येथील वास्तूचे नूतनीकरण
  सिंहगडावरील छत्रपती राजाराम महाराज समाधीचे नूतनीकरण

अन्य महत्त्वाच्या योजना 
  अंधांसाठी ऑडियो लायब्ररी
  शिक्षकांचे वेतन संगणकीकरणाद्वारे 
  सिटी लायब्ररी- दृक-श्राव्य स्वरूपात पुस्तके मिळणार 
  रोजगार व व्यावसायिक प्रशिक्षणासाठी ७ लाइट हाउस   
  महापालिकेच्या ३४ इमारतीवर सौर ऊर्जा प्रकल्प
  तुकाई माता उद्यानात लिली आणि रॉक पार्क
  नव्या अकरा गावांत ‘लोकल एरिया प्लॅन’ राबविणार. 
  राजाराम पूल येथे आर्ट प्लाझा
  हडपसर आणि रामटेकडी, बोपोडी चौकात भुयारी मार्ग
  वडगाव शेरी येथील नवीन पार्किंग तळ विकसित करणार

शिवसृष्टीसाठी तरतूदच नाही
चांदणी चौकातील नियोजित शिवसृष्टीसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. मात्र शिवसृष्टी व्हावी, यासाठी हालचाली सुरू असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. गेल्या वर्षी अर्थसंकल्पात दहा कोटींची तरतूद करण्यात आली होती. या प्रकल्पाला गती देण्यासाठी अर्थसंकल्पात काय नियोजन केले जाते, याची सर्वांना उत्सुकता होती. मात्र शिवसृष्टीसाठी तरतूद करण्यात आली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

दिव्यांगांना सुविधा
पीएमपीचे डेपो आणि बसथांब्यांमध्ये व्हीलचेअर, ऑडिओ लायब्ररी, क्रीडा स्पर्धा, व्यायामशाळा या सुविधा आता दिव्यांगांना मिळणार आहेत, तसेच महापालिकेच्या मुख्य इमारतीसह क्षेत्रीय कार्यालय आणि अन्य कार्यालयांमध्येही त्यांच्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

प्रत्येक वॉर्डांमध्ये पाळणाघर 
शहरातील संघटित आणि असंघटित क्षेत्रातील महिलांच्या सोयीसाठी प्रत्येक वॉर्डांत पाळणाघराची व्यवस्था राहणार आहे. त्यासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यापैकी २ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com