लॉकडाउन ५.० : पुणे शहरात काय सुरू राहणार? काय बंद राहणार? वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

शहरातील बाधित क्षेत्रातील दुकाने बंद आहेत. त्यामुळे या भागांतील रहिवाशांचे हाल सुरू आहेत.

Coronavirus Lockdown 5.0 पुणे : लॉकडाउनचा पाचवा टप्पा जाहीर झाला आणि आता पुण्यात बाधित (कंटेन्मेंट), सूक्ष्मबाधित क्षेत्र (मायक्रो कंटेन्मेंट) वाढवून नव्या उपायांची तयारी महापालिकेने सुरू केली आहे.

- महत्त्वाची बातमी : पुणेकरांनो वाचा लॉकडाउन5च्या गाईडलाईन्स

कोरोना रुग्णांची संख्या पाहता जुन्या बाधित क्षेत्र बदलले जाणार आहेत. या टप्प्यांत बाधित क्षेत्रातील जीवनाश्‍यक वस्तुंची दुकाने उघडण्याची मुभा राहणार असून, सूक्ष्म बाधित ठिकाणी मात्र कठोर निर्बंध असण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, या टप्प्यात काही प्रमाणात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, अर्थात 'पीएमपी', रिक्षा वाहतूक सुरू होऊ शकते; असा अंदाजही महापालिका प्रशासनाचा आहे. त्यादृष्टीने पूर्वतयारी करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. 

- शाळा-महाविद्यालयांचा मुहूर्त ठरला; 'या' महिन्यात शाळेची घंटा वाजणार!

दुसरीकडे, कोथरुड, बाणेर-बालेवाडी, औंध, पाषाण, सिंहगड रस्त्यावरील काही भागांत फारसे रुग्ण न वाढल्याने येथील व्यवहारांत कोणताही बदल होणार नाही, हेही महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. ज्या एकाच ठिकाणी पाच रुग्ण असतील; तर तेथील इमारत किंवा बैठी घरांचा सूक्ष्मबाधित क्षेत्रात समावेश होईल. तसेच, पाचपेक्षा आधिक रुग्ण असलेला शंभर मीटरचा परिसर बाधित क्षेत्र म्हणून जाहीर केला जाईल, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले. पण ज्या जुन्या बाधित आणि सूक्ष्मबाधित क्षेत्रांतील रुग्ण कमी झाल्याने तो भाग वगळून त्या ठिकाणचे निर्बंध हटविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

- पेन्शन 600 देणगी 500 रुपये; कोरोनाच्या काळातलं सर्वांत मौल्यवान दान!

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात येत्या 30 जूनपर्यंत लॉकडाऊन ठेवण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. या टप्प्यांत काही सवलती देण्यात येणार आहेत. परंतु, बाधित क्षेत्रांसाठी लॉकडाउन कायम राहणार असून, तेथील सवलतीबाबत स्थानिक यंत्रणा निर्णय घेणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुण्यासाठी काही मर्यादा राहणार असल्याचे निश्‍चित आहे. त्यानुषंगाने लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात नेमक्‍या कोणत्या सवलती असतील, त्यांची अंमलबजावणी, संसर्गानुसारचे निर्बंध याचा आढावा घेऊन कार्यवाही करण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनाने केल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातील बाधित क्षेत्रातील दुकाने बंद आहेत. त्यामुळे या भागांतील रहिवाशांचे हाल सुरू आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील दुकाने विशेषत: जीवनाश्‍यक वस्तुंची दुकाने पूर्णवेळी उघडण्याची सवलत मिळण्याचीही शक्‍यता आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउनच्या नव्या टप्प्यातील केंद्र आणि राज्य सरकारांचे आदेश आल्यानंतर पुण्यातील धोरण जाहीर होईल. मात्र, तुर्तास आणखी उपाय करून कोरोनाला पूर्णपणे रोखण्याचा प्रयत्न आहे. ज्या भागांत निर्बंध घातले जातील आणि बाधित क्षेत्राबाहेरच्या सुविधा वाढविण्याबाबत नियोजन करीत आहोत. मात्र, दोन्ही सरकारांच्या आदेशावर कार्यवाही होईल.
- शेखर गायकवाड, आयुक्त, पुणे महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Municipal Corporation has started preparing new measures after announced fifth phase of lockdown