पुण्यात शत प्रतिशत भाजप!

उमेश घोंगडे
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

आठ आमदार आणि आता पालिकाही ताब्यात

आठ आमदार आणि आता पालिकाही ताब्यात

पुणे: सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पराभव करून पुण्यात भारतीय जनता पक्षाने जवळपास स्वबळावर सत्ता हस्तगत करण्याचा मनसुबा पूर्ण केला. बहुमत मिळवून सत्तेत येणारच असा आत्मविश्‍वास शहर पातळीवरील सर्व पदाधिकारी सुरवातीपासूनच व्यक्त करीत होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या रिकाम्या खुर्च्या आणि गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांना दिलेल्या तिकीटांमुळे पक्षावर झालेल्या टिकेच्या पार्श्‍वभूमीवर भाजपाचे यश निश्‍चितच आश्‍यर्चकारक म्हणावे लागेल. दुसरीकडे या निकालाने राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का बसला असून पक्ष संघटनेबाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. पुण्यात खासदार भाजपचा, आठ आमदारही भाजपचेच आणि आता पालिकाही भाजपच्या ताब्यात गेली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच शत प्रतिशत भाजपची सत्ता पुण्यात आली आहे.

गेल्या निवडणुकीत भाजपला 26 जागा मिळाल्या होत्या. 26 वरून 77 पर्यंत पक्षाने मारलेली मजल मोठी आहे. सत्ता हस्तगत करायचीच या उद्देशाने इतर पक्षातील अनेकांना भाजपाने उमेदवारी दिली. यातील बहुसंख्य निवडून आले आहेत. या साऱ्यांना पक्षात आणण्यात मोठी भूमिका बजावल्याने खासदार संजय काकडे यांचे राजकीय वजन आणखी वाढणार आहे. बहुमत मिळाले नाही तर सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेऊ, खासदार काकडे यांनी जाहीर केले होते. आपण बाहेरून आणलेल्या तसेच पक्षातील माझ्या सुमारे 60 जणांना पक्षाने उमेदवारी दिली आहे, असे त्यांनी यापूर्वीच सांगितले होते. आता साहजिकच त्यांच्या शब्दाला किंमत द्यावी लागेल असे निकाल आले आहेत. खासदार काकडे यांनी श्रेय घेतले तरी या निकालाने पालकमंत्री बापट यांचे वजन आणखी वाढणार आहे. या निवडणुकीत काकडे तसेच शहराध्यक्ष गोगावले सक्रिय होते. तरीही सारी सूत्रे पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडेच होती. त्यामुळे या यशाचे सर्वाधिक श्रेय त्यानांच मिळाणार हे नक्की. एकिकडे भाजपाचा वारू जोरात असताना या निवडणुकीने राष्ट्रवादीला मोठे धक्के दिले आहेत. पक्षाचे सभागृह नेते बंडू केमसे यांचा सपशेल पराभव झाला असून माझी सभागृह नेते सुभाष जगताप पराभवाच्या छायेत आहेत. सिंहगड रस्ता, नगर रस्ता परिसरातील राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातही पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विकास दांगट, श्रीकांत पाटील, यासारखे अनेक दिग्गज पराभूत झाले आहेत. विशेष म्हणजे या जागांवर फारसे माहितीचे नसलेले अनेक नवखे चेहरे निवडून आले आहेत. केवळ भाजपाची उमेदवारी मिळाली म्हणून निवडून आल्याचे अनेक नावांवरून लक्षात येईल. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये तिकीट वाटपात शहर पातळीवरील नेत्यांबरोबर झालेल्या मतभेदांमुळे काहींनी पक्ष सोडला तर अनेकांनी पक्षात राहून आपल्याच उमेदवारांना पाडण्यात मदत केली आहे. या साऱ्याचा परिणाम राष्ट्रवादीच्या यशावर झाला असून पक्षाने गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

गेल्या महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 29 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत मनसे सहा जागादेखील मिळवू शकत नाही. राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना व कॉंग्रेस या साऱ्याच पक्षांना भाजपने या निवडणुकीत धक्के दिले आहेत. राष्ट्रवादीच्या दहा, शिवेसेनेच्या चार, कॉंग्रेसच्या दहा तर मनसेच्या तब्बल 23 जागा कमी झाल्या आहेत. या साऱ्या जागा भाजपाने आपल्याकडे खेचण्यात यश मिळविले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कमी झालेल्या 23 जागांपैकी दोन-तीन अपवाद वगळता जवळपास सर्व ठिकाणच्या जागा भाजपाने खेचून आणल्या आहेत.
तळागाळात स्थान असलेल्या कॉंग्रेसची स्थिती केवळ नेतृत्वाअभावी दयनीय झाली आहे. गेल्यावेळी 26 जागा मिळविलेला हा पक्ष सध्या नेतृत्वहीन आहे. अनेक ठिकाणी निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना पुरेसे पाठबळ मिळू शकले नाही. प्रचारासाठीही राज्य पातळीवरील नेतृत्वाने फारसा वेळ दिला नाही. या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या दोन लढती म्हणजे रेश्‍मा भोसले यांची उमेदवारी तसेच रवींद्र धंगेकर व भाजपाचे महापालिकेतील गटनेते गणेश बिडकर यांच्यातील लढत या अत्यंत अटीतटीच्या व शहराचे लक्ष लागून राहीलेल्या या निवडणुकीत अपक्ष निवडणून लढवून धंगेकर यांनी बिडकर यांचा पराभव केला तर भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार रेश्‍मा भोसले यांची मोठ्या मतांच्या फरकाने विजय मिळविला.

Web Title: pune municipal election and bjp