पुणे-नाशिक महामार्गास वाकीमध्ये नदीचे स्वरूप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसाचे पाणी महामार्गावर दोन ते तीन फुटांपर्यंत तर काही भागांत चार फुटांपर्यंत साचले होते. त्यामुळे महामार्गाला नदीचे स्वरूप आले होते.

चाकण - पुणे-नाशिक महामार्गावर वाकी खुर्द (ता. खेड) हद्दीत मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास झालेल्या पावसाचे पाणी आले. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. महिनाभरापूर्वी अशाच प्रकारे महामार्गावर पाणी आले होते. ओढा बुजविल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे नागरिकांनी सांगितले. 

महामार्गालगतचे जुने ओढे काहींनी बुजविले आहेत, तसेच पाणी वाहून जाण्यासाठी जागा नसल्याने पावसाचे पाणी महामार्गावर येत आहे. मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसाचे पाणी महामार्गावर दोन ते तीन फुटांपर्यंत तर काही भागांत चार फुटांपर्यंत साचले होते. त्यामुळे महामार्गाला नदीचे स्वरूप आले होते. या ओढ्याचे पाणी काही घरांतही शिरते, त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या वर्षी दोन वेळा महामार्गावर पाणी आले आहे. ओढा बुजविणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. 

दरम्यान, पुणे-नाशिक महामार्गावर पावसामुळे वाहतूक कोंडी झाली होती. चाकण ते आळंदी फाटा या दोन किलोमीटर अंतराच्या प्रवासाला अगदी सव्वा ते दीड तास लागत होता. त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले होते. चाकण-शिक्रापूर मार्गावरही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune-Nashik Highway