रविवार ठरला वाहतूक कोंडीचा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

मंचर - पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर येथे रविवारी (ता. ३०) सकाळी दहा वाजल्यापासून वाहतूक कोंडीच्या समस्येला वाहनचालक व नागरिकांना तोंड द्यावे लागले. रविवारी मंचरचा आठवडे बाजार असल्याने तसेच लग्नसराईमुळे वाहतूक कोंडी झाली होती. संध्याकाळपर्यंत वाहतूक अत्यंत मंद गतीने सुरू होती. 

मंचर - पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर येथे रविवारी (ता. ३०) सकाळी दहा वाजल्यापासून वाहतूक कोंडीच्या समस्येला वाहनचालक व नागरिकांना तोंड द्यावे लागले. रविवारी मंचरचा आठवडे बाजार असल्याने तसेच लग्नसराईमुळे वाहतूक कोंडी झाली होती. संध्याकाळपर्यंत वाहतूक अत्यंत मंद गतीने सुरू होती. 

जीवन मंगल कार्यालय, महात्मा गांधी विद्यालय, पिंपळगाव फाटा, मुळेवाडी चौक, ते अवसरी फाटा या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. समाधान हॉटेल येथे एसटी गाडी बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडीला सुरवात झाली. अवजड वाहनांची संख्याही अधिक होती, त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिक बिकट झाली होती. राजगुरुनगर व नारायणगाव या दोन्ही दिशांना ये- जा करणाऱ्या एसटी बस व खासगी ट्रव्हललाही वाहतूक कोंडीचा फटका बसला.

अवसरी फाटा ते जीवन मंगल कार्यालय हे चार किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी एक तास लागत होता. दुपारी तीन वाजता तर बसस्थानक ते पिंपळगाव फाट्यापर्यंत वारंवार वाहतूक खंडित होत होती. या गर्दीत आठवडे बाजाराचीही भर पडली. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक पर्यटकांची भीमाशंकरकडे जाण्यासाठी वर्दळ वाढली आहे.  

एकलहरे, निघोटवाडी, शेवाळवाडी, तांबडेमळा या बाह्य वळणाचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. पण भूसंपादन झालेल्या जमिनीचा मोबदला अजून शेतकऱ्यांना मिळाला नाही. पळून गेलेल्या कंत्राटदारांच्या जागेवर नवीन कंत्राटदाराची नेमणूक झालेली नाही. त्यामुळे बाह्य वळणाचे काम रेंगाळलेले आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

पोलिसांची संख्या अपुरी
मंचर पोलिस ठाण्यातील एकूण पोलिस कर्मचाऱ्यांपैकी ७० टक्के पोलिस भीमा कोरेगाव येथे बंदोबस्तसाठी गेले आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची संख्या अपुरी पडत होती. नवरदेवांच्या मिरवणुका, अपुरा रस्ता व बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत होती. पोलिस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत होते.

Web Title: Pune Nashik Highway Traffic