
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या सूचनेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज झालेल्या अर्थसंकल्पामध्ये पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला राज्य सरकारच्या मंजुरीची घोषणा केली आहे.
मंचर : मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या सूचनेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज झालेल्या अर्थसंकल्पामध्ये पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला राज्य सरकारच्या मंजुरीची घोषणा केली आहे. यामुळे गेल्या 17 वर्षांपासूनच्या लढ्याला अंतिम स्वरूप आले. शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेचे स्वप्न पूर्ण करण्यात आपल्याला यश आल्याची भावना शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केली.
मार्केटयार्डातील वाय उड्डाणपुलाची निवीदा होणार रद्द
आढळराव पाटील म्हणाले, ''गेली 17 वर्षे सातत्याने विविध स्तरावर पुणे-नाशिक रेल्वेसाठी पाठपुरावा केल्यानंतर 2016 मध्ये तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी 2425 कोटी खर्चाच्या या प्रकल्पाला मंजुरी देऊन त्यानंतर राज्यातील प्रकल्पांच्या कार्यन्वयनासाठी महारेलची स्थापना झाली.
- Breaking : पुण्यात आगीच्या दोन घटना; पुणे-सोलापूर हायवेवर ट्रॅफिक जाम
याद्वारे राज्यातील पहिल्या तीन प्रकल्पांमध्ये तसेच ब्रिटिश कालीन रेल्वे बोर्डाच्या पिंकबुक मध्येही या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला. महारेलच्या वतीने या प्रकल्पाचे नव्याने सर्वेक्षण होऊन सुरुवातीला 7500 कोटी खर्च असलेल्या या प्रकल्पाचे हायस्पीड रेल्वे प्रकल्पात समावेशन होऊन दुहेरी रेल्वेलाईन प्रस्तावित करण्यात आली. आधुनिकीकरण व अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे या प्रकल्पाची किंमत 16 हजार 39 कोटी रुपये होऊन रेल्वे बोर्डाची मंजुरी घेण्यात आली. त्यांनतर या प्रकल्पाला राज्य शासनाने मंजुरी द्यावी यासाठी फेब्रुवारी 2020 मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मी भेट घेऊन आग्रही मागणी करत प्रकल्पाचे महत्व समजावून सांगितले. त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच यासंबंधीची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यानंतर सुरु झालेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाने हि प्रक्रिया पुढे सहा-सात महिने लांबणीवर पडली. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा सुरू केल्याने 14 जानेवारी रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
या बैठकीस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्य सचिव संजीव कुमार, परिवहन विभागाचे सचिव आशिष कुमार सिंग, महारेल चे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या सर्वांची परिणीती म्हणून आज या प्रकल्पाला राज्य सरकारने मान्यता दिली असून यासाठी 3208 कोटीच्या खर्चास मंजुरी दिली आहे. लवकरच या प्रकल्पाची भूसंपादन प्रक्रिया सुरु होऊन पुढील ५-६ वर्षात हा प्रकल्प पूर्ण होऊ शकेल.''
मोठी बातमी: सैन्य भरतीच्या पेपर फुटीचे धागेदोरे महाराष्ट्राबाहेर
पुणे व नाशिक या दोन्ही जिल्ह्यांच्या कृषी व औद्योगिक क्षेत्राला लाभदायक ठरणाऱ्या या प्रकल्पाची गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पाला मंजूरी दिल्याने माझ्यासह या भागातील नागरिकांनी पाहिलेले स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरेल अशी अपेक्षा व्यक्त करत महाविकास आघाडी सरकारचे शिवसेना उपनेते, संपर्कप्रमुख, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अभिनंदन व्यक्त केले.
(संपादन : सागर डी. शेलार)