‘फास्ट फूड’मुळे मुलांच्या आरोग्याला धोका

योगिराज प्रभुणे
सोमवार, 11 डिसेंबर 2017

शहरातील १२ टक्के लहान मुलांना मोठेपणी जीवनशैलीशी संबंधित आजार होण्याचा धोका असल्याचा निष्कर्ष शालेय मुलांच्या आरोग्य तपासणीतून निघाला आहे. वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्यास प्रत्येक आठ विद्यार्थ्यांमागे मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलता यांचा एक रुग्ण असेल, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. 

‘फास्ट फूड’ हे शालेय मुलांच्या आहाराचा एक भाग झाल्याचे चित्र शहरात दिसत आहे. विद्यार्थी, मग ते प्राथमिक शाळेतील असोत की माध्यमिक, त्यांच्या आहारात पोषक द्रव्यांच्या तुलनेत ‘फास्ट फूड’चे प्रमाण जास्त असते, हे निरीक्षण वेगवेगळ्या शाळांमधील शिक्षकांनी टिपले आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी ‘हेल्दी टिफीन’सारखे उपक्रमदेखील काही शाळांमधून राबविण्यात येत आहेत. त्याचा प्रत्यक्ष परिणाम मुलांवर दिसण्यासाठी अजून काही वेळ द्यावा लागणार असल्याचे शिक्षकांचे मत आहे. या पार्श्‍वभूमीवर ॲड्रेस हेल्थच्या वतीने पुण्यासह हैदराबाद आणि बंगळूर येथील प्राथमिक आणि माध्यमिक मिळून सुमारे १५० शाळांमधील दोन लाख विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यापैकी पुण्यातील ४ ते १६ वयोगटांतील दोन हजार ७०० मुलांची तपासणी करण्यात आली. त्याच्या विश्‍लेषणातून शहरातील बारा टक्के मुलांना नजीकच्या भविष्यात जीवनशैलीशी संबंधित आजाराची शक्‍यता असल्याचे अधोरेखित केले आहे. 

शहरातील वेगवेगळ्या शाळांमधील विविध वयोगटांतील प्रत्येकी आठमागे एका मुलाला तत्काळ प्रतिबंधक उपाय न योजल्यास मोठेपणी जीवनशैलीविषयक किंवा चयापचयविषयक आजार होण्याचा धोका असल्याचे दिसून आले आहे. (हे निरीक्षण मुलांच्या कमरेचा घेर आणि उंची यांच्या प्रमाणावर आधारित आहे आणि प्रमाणित ०.५ टक्‍क्‍यांहून खूपच अधिक आहे.)

सर्वेक्षणातील निष्कर्ष
हे सर्वेक्षण याच शैक्षणिक वर्षातील आहे. लहान मुलांमध्ये स्थूलतेचे प्रमाण वाढत असून ११ टक्के मुले स्थूल; तर १३ टक्के मुले लठ्ठ आहेत. प्राथमिक शाळेतील १२.३ टक्के मुले स्थूल; तर १३.२ टक्के मुले लठ्ठ असून, माध्यमिक शाळांतील १९.३ टक्के मुले अधिक स्थूल आणि १९.३ टक्के लठ्ठ असल्याचे आढळले आहे. सर्वेक्षण केलेल्यांतील ४५ टक्के मुले पोषणवंचित (अतिपोषणाने स्थूल अथवा लठ्ठ किंवा कुपोषणाने कृश अथवा हडकुळी) असल्याचे समोर आले आहे.

सर्वेक्षणाची प्रमुख निरीक्षणे
 विविध वयोगटांतील १७.८ टक्के शालेय विद्यार्थ्यांना दृष्टिदोष असून, पहिलीच्या पुढील प्रत्येकी चारमागे एका विद्यार्थ्याला चष्म्याची गरज आहे.
 प्रत्येकी तीनपैकी एकापेक्षा जास्त मुलांमध्ये दात किडण्याची समस्या असून, शिशू गटातील मुलांमध्ये दातांचे अनारोग्य; तसेच खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे दात किडण्याचे प्रमाण अधिक आहे.

मुलांमध्ये असंसर्गजन्य रोगांची बीजे लवकरच्या वयात रुजत आहेत आणि त्यामागे सुखासीन जीवनशैली, आहार प्रारूपातील बदल, शाळांनी; तसेच अनेक पालकांनी मुलांच्या आरोग्य व स्वास्थ्यावर पुरेसा भर न देणे आदी विविध कारणे आहेत. ही स्थिती तातडीने बदलण्याची गरज आहे.
- डॉ. आनंद लक्ष्मण,  संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, ॲड्रेस हेल्थ

प्रत्येक मुलाच्या आवडी- निवडी वेगळ्या असतात; पण मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी संतुलित आहाराचे महत्त्व असते. त्यामुळे ‘हॅपी अँड हेल्दी चाइल्ड’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक बुधवारी मुलांनी डब्यात कोणता पदार्थ आणायचा, हे पालकांना आधीच सांगितले जाते. त्यातून सकस आहार मुलांना मिळतो.
- संजीवनी बेडदूर,  मुख्याध्यापिका, बाल शिक्षण मंदिर, इंग्लिश मीडियम स्कूल

Web Title: pune new fast food children health