पोलिसांच्या वेशात दरोडा टाकणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

पुणे - पोलिसांच्या वेशात येऊन दरोडा टाकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील दरोडेखोरांना गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली. शिवाजीनगर पोलिस मुख्यालयाजवळ टाकलेल्या या दरोड्यात आरोपींनी लुबाडलेल्या रकमेपैकी 21 लाखांची रोकड, दोन एअरगन आणि स्कॉर्पिओ जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त पंकज डहाणे आणि सहायक आयुक्‍त सुरेश भोसले यांनी दिली. 

पुणे - पोलिसांच्या वेशात येऊन दरोडा टाकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील दरोडेखोरांना गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली. शिवाजीनगर पोलिस मुख्यालयाजवळ टाकलेल्या या दरोड्यात आरोपींनी लुबाडलेल्या रकमेपैकी 21 लाखांची रोकड, दोन एअरगन आणि स्कॉर्पिओ जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त पंकज डहाणे आणि सहायक आयुक्‍त सुरेश भोसले यांनी दिली. 

शिवाजीनगर मुख्यालयाजवळ गेल्या 24 ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला होता. याप्रकरणी मनोज ऊर्फ कांतिलाल धनाजीभाई डेंडोरे (वय 38, रा. रास्ता पेठ) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सूरज कनुभाई राठोड ऊर्फ हालपट्टी (वय 34, रा. दीव-दमन) आणि कमलेश बाबूभाई धोडी (वय 26, रा. धोडीपाडा, जि. वलसाड, गुजरात) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, अनिल ऊर्फ मामा रामचंद्र आढाव (वय 42, रा. दीव-दमन), पप्पू यादव ऊर्फ बिहारी, नरेश नट्टू गामित (वय 38, पिथादरा डोलवन, ता. व्यारा, जि. तापी, गुजरात) यांच्यासह अन्य तिघांचा पोलिस शोध घेत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेंडोरे हे राजेश मणिलाल ऍण्ड कुरिअर कंपनीत वाहनचालक आहेत. कुरियर कंपनीचे व्यवस्थापक पिंटुभाई ऊर्फ मिस्त्री जयदीपभाई दशरथभाई यांनी कर्मचाऱ्यांना गुरुवारी (ता. 24) पहाटे बॅगेत 31 लाखांची रोकड देऊन मुंबईला जाण्यास सांगितले होते. त्यानुसार, तिघे कर्मचारी गाडी घेऊन निघाले. शिवाजीनगर पोलिस मुख्यालयापासून काही अंतरावर अंबर दिवा असलेल्या स्कॉर्पिओमधून पोलिसांच्या वेशात पाचजण आले. त्यांनी या कर्मचाऱ्यांकडील 31 लाखांची रोकड लुबाडून नेली होती. 

गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचारी गजानन सोनुने यांना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नऊ जणांनी हा दरोडा टाकल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. त्यावरून अतिरिक्‍त आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन भोसले-पाटील, युनिट तीनचे पोलिस निरीक्षक सीताराम मोरे, सहायक निरीक्षक बाबर, धनंजय कापरे, उपनिरीक्षक दिनेश पाटील, हर्षल कदम, पोलिस कर्मचारी प्रकाश लोखंडे, इम्रान शेख, सचिन जाधव, मोहन येलपल्ले, अशोक माने, राजू पवार, सहायक फौजदार राजाराम सुर्वे, कैलास गिरी, विजयसिंह वसावे, प्रशांत गायकवाड, मेहबूब मोकाशी, रिजवान जिनेडी, उमेश काटे, सुभाष पिंगळे, सुरेंद्र आढाव, तुषार खडके, श्रीकांत वाघवले, इरफान मोमीन यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

आरोपींचे फलटण कनेक्‍शन 
या टोळीतील अनिल आढाव हा सातारा जिल्ह्यातील फलटणचा आहे. ही टोळी कुरियर कंपन्यांवर पाळत ठेवून दरोडा टाकत होती. आढाव याच्या फलटण कनेक्‍शनमुळे पोलिसांना या दरोडेखोरांचे धागेदोरे हाती लागले. या टोळीने दीव दमण, गुजरात, कर्नाटक, दिल्ली, राजस्थानमध्ये दरोडा टाकल्याचे गुन्हे दाखल आहेत. पुण्यात दरोडा टाकण्यापूर्वी त्यांनी गुजरातमध्ये स्कॉर्पिओ गाडीसह 80 लाखांची रोकड पळविली होती. 

Web Title: pune new Interstate gang raid