व्यसनाधिनता रोखण्यासाठी पोलिस करणार युवापिढीचे प्रबोधन

मिलिंद संगई
बुधवार, 12 जुलै 2017

युवापिढीतील वाढती व्यसनाधिनता रोखण्यासाठी आता पोलिस अधिकारी वैयक्तिक पातळीवर प्रबोधनात्मक प्रयत्न करणार आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी आज बारामतीत पत्रकारांशी संवाद साधताना याबाबत माहिती दिली.

बारामती - युवापिढीतील वाढती व्यसनाधिनता रोखण्यासाठी आता पोलिस अधिकारी वैयक्तिक पातळीवर प्रबोधनात्मक प्रयत्न करणार आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी आज बारामतीत पत्रकारांशी संवाद साधताना याबाबत माहिती दिली.

युवावर्गामध्ये विविध आकर्षणांमुळे व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढते आहे, अनेकदा व्यसनाधीन झाल्यावर काही युवकांची पावले गुन्हेगारीकडेही वळतात. त्यामुळे अगोदरच त्यांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न पोलिस अधिकारी करणार आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्यातील अधिका-याला आता व्यसनांपासून युवा पिढीने कसे दूर राहायला हवे याचे सादरीकरण आपापल्या हद्दीतील महाविद्यालयात जाऊन करण्याचे उद्दीष्टच देण्यात आले आहे. या नुसार अधिका-यांनी असे सादरीकरण तयार करण्यास प्रारंभ केला आहे. स्वताः पोलिस अधीक्षक व अतिरिक्त पोलिस अधीक्षकही असे सादरीकरण करणार आहेत. दरम्यान गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींवर मोका लावण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. या गुन्हेगारांनी गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर व्हावे असा आमचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

बारामती शहरातील वाहतूकीच्या प्रश्नावर मुख्याधिकारी मंगेश चितळे यांच्याशी चर्चा झाली असून लवकरच या बाबत सर्व संबंधित विभागांना एकत्र करुन काही उपाययोजना आखल्या जातील, अशी ग्वाही डॉ. पखाले यांनी या वेळी दिली. बारामतीतील वाहतूकीचा प्रश्न जटील आहे ही वस्तुस्थिती नाकारुन चालणार नाही, या बाबत सर्वांशी बोलून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करु, असे ते म्हणाले. तपासणी मोहिम वेगवान शहरासह सर्वच ठिकाणी अचानक वाहन तपासणी मोहिम सुरु करण्यात आली आहे. गुन्हेगारी कमी करणे, गुन्हेगारांना शहरात घुसण्यापासून रोखण्यासाठी विविध ठिकाणी अचानकच तपासणी करण्याच्या सूचना सर्व पोलिस ठाण्यांना दिल्या असून अशा तपासण्या सुरु झाल्याचे त्यांनी नमूद केले.

सीसीटीव्ही बाबत मार्गदर्शन घ्यावे
जर कोणी सीसीटीव्ही बसविणार असतील तर त्यांनी स्थानिक पोलिसांचे मार्गदर्शन घ्यायला हवे, जेणेकरुन काही प्रसंग घडल्यास संबंधित सीसीटीव्ही कॅमेरे चांगल्या क्षमतेचे असतील हे पाहणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. सीसीटीव्ही कॅमेरे सुस्थितीत आहेत व रात्रीही ते चित्रीकरण करु शकतील याची काळजी घ्यावी असे ते म्हणाले. भाडेकरुंची माहिती पोलिसांना द्यावी जे मालक आपल्या घरात किंवा दुकानात भाडेकरु ठेवतील त्याची इत्यंभूत माहिती जवळच्या पोलिस ठाण्याला देणे अनिवार्य आहे. अशी माहिती न देणा-या मालकांविरुध्द गुन्हे दाखल होतील, असा इशारा त्यांनी दिला.

Web Title: pune new marathi news sakal news police news baramati news