Pune News : अर्ध्या तासाच्या कामाला लावले १० दिवस; कनिष्ठ अभियंत्यास कारणे दाखवा नोटीस | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 light

Pune News : अर्ध्या तासाच्या कामाला लावले १० दिवस; कनिष्ठ अभियंत्यास कारणे दाखवा नोटीस

पुणे, : सातारा रस्त्यावरील सद्‍गुरू श्री शंकर महाराज उड्डाणपुलाखालील पथ दिव्यांची केबल तुटल्याने गेल्या १० दिवसांपासून येथील दिवे बंद होते. पण महापालिकेच्या विद्युत विभागाच्या अभियंत्यांनी निष्काळजीपणा करत याकडे लक्ष दिले नाही. मात्र, हा प्रकार निदर्शनास आणून देताच अर्ध्या तासात केबल दुरुस्त करून उड्डाणपुलाखालील पथदिवे सुरू झाले. कामात हलगर्जीपणा केल्याने कनिष्ठ अभियंत्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे.

रस्त्यावरील पथ दिव्यांचे वीज बिल, देखभाल दुरुस्तीसाठी महापालिका कोट्यावधी रुपये खर्च करत आहे. कधी अधिकाऱ्यांच्या आवडीनुसार तर कधी तत्कालीन नगरसेवकांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या आकारातील, रंगातील डेकोरेटिव्ह पथदिवे देखील शहरात अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत. शंकर महाराज उड्डाणपूल उभारल्यानंतर तेथे विद्युत रोषणाईवर कोट्यावधी रुपये खर्च करून विविध प्रकारेच दिवे पुलाच्या वर, पुलाच्या खाली लावण्यात आले होते.

शंकर महाराज उड्डाणपुलावर आता जी २०च्या निमित्ताने विद्युत रोषणाईवर खर्च केला जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली आहे. पण अस्तित्वातील पथदिवे सुरू करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. उड्डाणपुलाखालील ६५ पैकी ३५ दिवे बंद असल्याचे स्थानिक नागरिक आदित्य गायकवाड यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतरही महापालिकेने याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही.

`सकाळ’ने याचा पाठपुरावा केल्यानंतर मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल यांनी स्थानिक कनिष्ठ अभियंत्याला फैलावर घेतल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी तुटलेली केबल अवघ्या अर्ध्या तासात पुन्हा जोडून उड्डाणपुलाखालील दिवे सुरू केले.

‘‘शंकर महाराज उड्डाणपुलाखालील पथदिव्यांची केबल तुटल्याने हे दिवे बंद होते. कनिष्ठ अभियंत्यांनी ही केबल जोडली असून, इतके दिवस केबल दुरुस्त करण्याकडे का दुर्लक्ष केले याची विचारणा करून कारवाई केली जाईल. संबंधित कनिष्ठ अभियंत्याला सोमवारी कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल.’’

- श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग

ठेकेदाराला सांगून पथदिवे केले सुरू

सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाचे सुरू आहे, त्यातच माणिकबाग भागातील रस्त्याच्या दोन्ही बाजूचे पथदिवे गेल्या दोन आठवड्यापासून बंद होते. याबाबत ‘सकाळ’ने प्रकार निदर्शनास आणून देताच कंदूल यांनी त्या भागातील संबंधित कनिष्ठ अभियंता किंवा उप अभियंत्यांना न सांगता थेट ठेकेदाराला फोन करून पथदिवे सुरू करून घेतले. त्यामुळे पुन्हा एकदा संबंधित भागाची जबाबदारी असणाऱ्या अभियंते त्यांच्या कामाकडे लक्ष देत नसल्याचे समोर आले.

टॅग्स :Pune Newsstreet light