लोहगाव विमानतळासाठी पंधरा एकर जागा मिळेल - अनिल शिरोळे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

पुणे - लोहगाव विमानतळ विस्तारीकरणासाठी आणखी पंधरा एकर जागेची आवश्‍यकता आहे. पुढील महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली पायाभूत समितीची बैठक होणार आहे. त्यामध्ये या वाढीव जागेस मान्यता मिळण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती खासदार अनिल शिरोळे यांनी रविवारी दिली. ही वाढीव जागा मिळाल्यास रनवेची लांबी वाढविणे आणि नवीन कार्गो टर्मिनल व प्रवाशांसाठी पायभूत सुविधा उभारण्यास मदत होणार आहे.

लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम एअरपोर्ट ऍथॉरिटीकडून हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी हवाई दलाकडून पंधरा एकर जागा ताब्यात आली आहे. ताब्यात आलेल्या या जागेवर तसेच विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांसाठी काय सुविधा उभारण्यात आल्या आहेत, यांची माहिती देण्यासाठी खासदार शिरोळे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. या वेळी लोहगाव विमानतळाचे संचालक अजय कुमारही उपस्थित होते.

शिरोळे आणि कुमार म्हणाले, 'ताब्यात आलेल्या पंधरा एकर जागेवर 42 हजार चौरस मीटर क्षेत्रावर नवीन टर्मिनल इमारतीचे काम फेब्रुवारीत सुरू करण्यात येणार आहे. सध्या विमानतळावर सहा विमानांचे पार्किंगची (पार्किंग बे) सुविधा आहे. ती आणखी पाचने वाढविण्याचे काम करण्यात येणार आहे. याशिवाय वाहने पार्किंग सुविधा, विमानतळाजवळील रस्त्यांचे रुंदीकरण, नव्याने दोन रस्ते विकसित करणे, विमानतळावरील आसनांची संख्या 600 वरून 1500 पर्यंत वाढविणे, बोर्डिंग सुविधा, चेकिंग सीस्टिम, स्वच्छतागृह, नवीन उपगृहाचा उभारणी, 21 ठिकाणी विमानांच्या वेळपत्रकाची माहिती देणारे फलक आदी कामे करण्यात येत आहेत. यापैकी बहुतेक कामे मार्गी लागली आहेत.''

प्रवासी संख्या 82 लाखांवर
हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 2014-15 मध्ये 41 लाख, 2015-16 मध्ये 54 लाख, 2016-17 मध्ये 67 लाख प्रवाशी संख्या होती. यावर्षी म्हणजे 2017-18 मध्ये ही संख्या 82 लाखांपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे, असे अजय कुमार यांनी सांगितले, तर दरवर्षी विमानतळ प्राधिकरणाच्या नफ्यातही त्यामुळे 25 टक्‍क्‍यांनी वाढ होत आहे. यावर्षी 156 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, त्यातून 57 कोटी रुपयांचा नफा झाला असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

मालवाहतुकीची सुविधा वाढविणार
विमानतळावर कार्गो सुविधा निर्माण करण्यात आली असून, सध्या 15 ते 20 टन मालाची वाहतूक होत आहे. लवकरच ही सुविधा वाढविण्यात येणार असून, त्यासाठी सीमाशुल्क विभागाशी चर्चा सुरू आहे. त्यांची मान्यता मिळाल्यानंतर प्रवासी वाहतुकीसाठी जी उड्डाणे आहेत. त्या विमानांमधून आंतराष्ट्रीय विमानतळावर मालवाहतूक करण्यात येणार आहे. तेथून जगभर माल पाठविणे सोयीचे होणार आहे. तसेच जागा उपलब्ध झाल्यास येत्या तीन महिन्यांत आयात सुविधाही लोहगाव विमानतळावर निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असेही अजय कुमार यांनी सांगितले.

पुणे- कोल्हापूर सेवा लवकरच
केंद्र सरकारच्या "उड्डाण' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत सुरू झालेल्या पुणे- नाशिक सेवा नुकतीच सुरू झाली आहे. या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून, या कंपनीने पुणे- कोल्हापूरदेखील सेवा सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे. लवकरच त्या कंपनीकडून ही सेवाही सुरू करण्यात येईल, अशी अपेक्षा अजय कुमार यांनी व्यक्त केली.

Web Title: pune news 15 acer place for lohgaon airport