'सेट'चे अडीच हजार विद्यार्थी अपात्र

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

बैठक क्रमांक व इतर सांकेतांक नोंदविताना त्रुटीचा परिणाम
पुणे - राज्य शिक्षक पात्रता परीक्षेत (सेट) बैठक क्रमांक व इतर सांकेतांक नोंदविताना त्रुटी राहिल्याने सुमारे अडीच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांचे गुणदेखील जाहीर केलेले नाहीत.

बैठक क्रमांक व इतर सांकेतांक नोंदविताना त्रुटीचा परिणाम
पुणे - राज्य शिक्षक पात्रता परीक्षेत (सेट) बैठक क्रमांक व इतर सांकेतांक नोंदविताना त्रुटी राहिल्याने सुमारे अडीच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांचे गुणदेखील जाहीर केलेले नाहीत.

विद्यार्थ्यांनी आज सेट विभागात जाऊन यासंबंधी तक्रार केली. तसेच गुण जाहीर करण्याची मागणी केली आहे. परंतु विद्यापीठाने त्रुटीचा मुद्दा पुढे करीत या विद्यार्थ्यांचे गुण जाहीर करण्यास नकार दिला. त्यामुळे त्रस्त झालेले विद्यार्थी उच्च न्यायालयात धाव घेण्याच्या विचारात आहेत. विद्यार्थ्यांना होत असलेल्या अडचणीबाबत विद्यापीठाकडे विचारणा केली असता, विद्यार्थ्यांची चूक असल्याचे सांगण्यात आले.

"सेट' विभागाचे उपकुलसचिव विकास पाटील म्हणाले, 'परीक्षेवेळी बैठक क्रमांक आणि इतर तपशील नोंदविताना काळजी घेण्याविषयी विद्यार्थ्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. ही माहिती "ओएमआर शीट'मध्ये भरायची असल्याने त्याच चुका होऊ नये म्हणून त्यांना प्रवेश पत्राबरोबर सरावासाठी नमुना "ओएमआर शीट' देण्यात आले होते. त्यावर विद्यार्थ्यांनी सराव करणे अपेक्षित होते. गेल्या वर्षी देखील अशा चुका झाल्याने यावेळी त्या टाळण्यासाठी काळजी घेण्यात आली होती.''

विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेवर (ओएमआर शीट) बैठक क्रमांक, विषयांचा कोड टाकायचा असतो. हे कोड नोंदविताना अंकानुसार उत्तरपत्रिकेवरील पोकळ गोल शाईने भरावे लागतात. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी चुका केल्या आहेत. त्यामुळे निकाल तयार करताना अडचणी निर्माण झाल्याने या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केलेले नाहीत. या प्रकरणी विद्यार्थ्यांनी सेट विभागाकडे तक्रार केली आहे. परंतु विद्यापीठाच्या स्तरावर त्यांचा निकाल देण्यासंबंधी निर्णय घेता येणार नाही, असे पाटील यांनी सांगितले.

Web Title: pune news 2,500 students in set exam are ineligible