पीकविम्यावाचून 40 टक्के शेतकरी वंचित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

मराठवाडा, विदर्भातील स्थिती गंभीर; मुदतवाढीची मागणी

मराठवाडा, विदर्भातील स्थिती गंभीर; मुदतवाढीची मागणी
पुणे - प्राथमिक आढाव्यानुसार अनेक जिल्ह्यांत सरासरी 40 टक्के शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहिले आहेत. मराठवाडा, विदर्भासह पश्‍चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाअभावी अतिशय गंभीर परिस्थिती ओढावली आहे. यातच मुदतीअभावी पीकविमा वेळेत भरू न शकल्याने हजारो शेतकऱ्यांना लाभ मिळणार नसल्याचे चित्र आहे. यामुळे पीकविम्यास आणखी मुदतवाढ द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. दरम्यान, विधानसभेतही विरोधी पक्षांच्या आमदारांनी मुदतवाढीची मागणी लावून धरली.

बीड जिल्ह्यात बुधवारी (ता. 2) रात्री 8 वाजल्यापासून वेबसाईट बंद होती, ती आज मुदतीच्या अखेरच्या दिवशीही (शुक्रवार) सुरू झाली नाही. जिल्ह्यात विविध पिकांकरिता सहा लाख खातेदार शेतकऱ्यांचा विमा भरल्याची नोंद होती. गेल्या वर्षी ही संख्या 9 लाख 25 हजार होती. यामुळे यंदा पेरणीची टक्केवारी वाढूनही पीकविम्यापासून 40 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक शेतकरी वंचित राहिल्याचा अंदाज आहे.

दोन दिवसांपासून ऑनलाइन अर्ज घेण्यास सुरवात झाली, खरी मात्र शेवटच्या दिवशीही वेबसाइट कनेक्‍ट होत नसल्याने वऱ्हाडातील हजारो शेतकरी रिकाम्या हाताने परतले. या वेळी संतप्त शेतकऱ्यांनी अकोला तालुक्‍यातील बोरगाव मंजू येथील महामार्गावर रास्ता रोको केला.

ठिकठिकाणी वेबसाइटला प्रतिसाद मिळत नसल्याने केंद्रचालक व शेतकरी असे दोघेही त्रासले होते. या मुदतीच्या काळात राहिलेल्या कर्जदार शेतकऱ्यांपैकी 10 ते 15 टक्केही शेतकरी "कव्हर' होऊ शकले नसल्याची वस्तुस्थिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बोलताना मान्य केली.
पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत गुरुवारपर्यंत परभणी जिल्ह्यातील 3,40,905 शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव भरले आहेत, अशी माहिती जिल्हा अग्रणी बॅंकेच्या सूत्रांनी दिली. याआधी 2015-16 या वर्षांत सर्वाधिक 5 लाख 89 हजार 83 शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता. बॅंकाकडे सादर करण्यात आलेले ऑफलाइन प्रस्ताव ऑनलाइन केल्यानंतर विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या, भरणा केलेला विमा हप्ता, पीकनिहाय संरक्षित विमा क्षेत्र ही माहिती 10 ऑगस्टपर्यंत उपलब्ध होणार आहे.

लातूर जिल्ह्यातील तीन लाख 58 हजार 240 शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या माध्यमातून 31 जुलैअखेर 35 कोटी आठ लाख 58 हजार रुपये पीकविमा हप्ता भरला आहे. सात वर्षांत सर्वाधिक प्रीमियम याच वर्षी भरला गेला आहे. पावसाने पाठ फिरवल्याने हवालदिल शेतकऱ्यांना पीकविम्याशिवाय आधार राहिलेला नाही. या वर्षी जिल्ह्यात जिल्हा बॅंकेने 116 शाखेतून योग्य नियोजन केल्याने शेतकऱ्यांना पीकविमा भरता आला आहे. गतवर्षी खरीप हंगामात जिल्ह्यात तीन लाख 34 हजार 303 शेतकऱ्यांनी 29 कोटी 84 लाख 79 हजार इतका पीकविमा भरला होता. त्या तुलनेत चालू खरीप हंगामात 23 हजार 943 शेतकऱ्यांनी पाच कोटी 23 लाख 69 हजार रक्कमेचा जादा पीकविमा हप्ता भरला आहे.

अशा आहेत अडचणी
-इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी
-बॅंकांची अर्ज स्वीकारण्यास असमर्थता
-अनके भागात लूट सुरूच

विधानसभेतही मुदतवाढीची मागणी
मुंबई : राज्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. भरीस भर बॅंकांच्या असहकार्यामुळे पीकविम्यापासून शेतकरी वंचित राहिला आहे. यामुळे शेतकरी हिताचा विचार करून पीकविम्याला पुन्हा मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी विधानसभेतील आमदारांनी शुक्रवारी औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली. आमदार जयप्रकाश मुंदडा आणि आमदार बच्चू कडू यांनी पीकविम्याच्या प्रश्‍नाकडे सरकारचे लक्ष वेधले. राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी पीकविम्याला 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यचीा मागणी केली.

Web Title: pune news 40 per cent of the farmers deprived of crop insurance