सहा हजार स्वयंसेवकांचे संचलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

पुणे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिनानिमित्त विजयादशमीच्या दिवशी शहरात संचलन करण्यात आले. पुणे महानगर रचनेतील ४४ भागांमधील तब्बल सहा हजार स्वयंसेवकांनी यात सहभाग घेतला. उपनगरांसह शहरानजीकच्या गावांमध्येही पथसंचलन झाले. 

पुणे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिनानिमित्त विजयादशमीच्या दिवशी शहरात संचलन करण्यात आले. पुणे महानगर रचनेतील ४४ भागांमधील तब्बल सहा हजार स्वयंसेवकांनी यात सहभाग घेतला. उपनगरांसह शहरानजीकच्या गावांमध्येही पथसंचलन झाले. 

एसएसपीएमएस शाळेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मानवंदना देण्यात आली. या प्रसंगी महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित होते. टिळक यांच्या हस्ते शंख व भगव्या ध्वजाचे पूजन झाल्यानंतर संचलनाला सुरवात झाली. संचलनाच्या मार्गावर आकर्षक रांगोळी, फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. स्वयंसेवक व भगव्या ध्वजावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात येत होती. नांदेडसिटी, वाघोली, बालेवाडी, सातववाडी, लोणी काळभोर, उरुळी कांचनमध्येही पथसंचलन झाले. 

संघाचे संपर्कप्रमुख प्रा. अनिरुद्ध देशपांडे, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, कार्यवाह महेश करपे, खासदार अनिल शिरोळे व संजय काकडे, राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह आमदारांनीही संचलनात सहभाग घेतला. तर महिला आमदारांनी संचलनमार्गात ध्वजाचे स्वागत केले. 

कोंढव्यातील जामा मशीद व शिवराज चौकात मुस्लिम समाजातर्फे संचलनाचे स्वागत करण्यात आले. तर मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्टतर्फे लष्कर भागातील बाबाजान दर्गा येथे संचलनाचे स्वागत करण्यात आले. लष्कर-भवानी पेठ विभागप्रमुख प्रशांत यादव यांचा ट्रस्टतर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष मुश्‍ताक पटेल, पुणे विघ्नहर्ता न्यासचे डॉ. मिलिंद भोई आदी उपस्थित होते.

Web Title: pune news 6000 rss Volunteer dasara