आधार दुरुस्तीसाठी आठ ठिकाणी "यूसीएल किट' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

पुणे - शहरातील नागरिकांच्या आधार कार्डमधील मोबाईल क्रमांक, पत्ता, जन्मतारीख, लिंग, नावातील दुरुस्तीसाठी पुणे महापालिकेच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सात आणि जिल्हाधिकारी कार्यालयात एक अशा आठ ठिकाणी "अपडेट्‌स क्‍लायंट लाइफ' (यूसीएल) किट कार्यान्वित केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. 

पुणे - शहरातील नागरिकांच्या आधार कार्डमधील मोबाईल क्रमांक, पत्ता, जन्मतारीख, लिंग, नावातील दुरुस्तीसाठी पुणे महापालिकेच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सात आणि जिल्हाधिकारी कार्यालयात एक अशा आठ ठिकाणी "अपडेट्‌स क्‍लायंट लाइफ' (यूसीएल) किट कार्यान्वित केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. 

आधार केंद्रांवर सुमारे 80 टक्के नागरिक हे आधार कार्डातील माहिती अद्ययावत करण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी येतात. त्याच्यासाठी यूसीएल किट बसविण्यात आले आहेत. प्रायोगिक तत्त्वावर हे कीट बसविले गेले आहेत. दरम्यान, सध्या जिल्ह्यात 196 आधार केंद्र सुरू आहेत. पुणे महापालिकेच्या हद्दीत 84, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या परिसरात 49 आणि ग्रामीण भागात 63 केंद्र आहेत. नव्याने आधार कार्ड काढण्यापेक्षा माहिती अद्ययावत करण्याचे प्रमाण जास्त आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या हातांचे ठसे किंवा डोळ्यांच्या बुबुळांचे "आयरिश स्कॅनिंग' होत नसल्यास संबंधित ज्येष्ठ नागरिकांची नोंद करून त्याची पावती "यूआयडीएआय'कडे पाठविण्यात येत आहे. संबंधित नागरिकांना "यूआयडीएआय'कडून आधार कार्ड पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. 

याबाबत "आधार'चे मुख्य नोडल अधिकारी तहसीलदार विकास भालेराव म्हणाले, ""सहा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सात आणि जिल्हाधिकारी कार्यालयात एक असे आठ किट लावण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे. सध्या आधारमधील माहिती अद्ययावत करण्यासाठी एका नागरिकाला किमान 10 ते 15 मिनिटे लागतात. दिवसभरात एका मशिनवर सुमारे 25 नागरिकांना सेवा मिळू शकते. "यूसीएल किट'मुळे आता अवघ्या पाच मिनिटांत माहिती अद्ययावत होऊ शकणार आहे.'' 

या क्षेत्रीय कार्यालयांत आहे यूसीएल किट 
वारजे क्षेत्रीय कार्यालय, हडपसर क्षेत्रीय कार्यालय, टिळक रोड क्षेत्रीय कार्यालय, कोंढवा खुर्द क्षेत्रीय कार्यालय, रामवाडी क्षेत्रीय कार्यालय, धनकवडी क्षेत्रीय कार्यालय (दोन किट) आणि नवीन जिल्हाधिकारी कार्यालय.

Web Title: pune news aadhar card