खासगी आधार केंद्रांतून नागरिकांची लूट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

हडपसर - महाऑनलाइन केंद्रात आधार नोंदणीसाठी गेल्यानंतर टोकन देऊन थेट १५ ते २० दिवसांची तारीख दिली जात आहे; तर काही खासगी एंटरप्राइजेसमध्ये आधार नोंदणीसाठी नागरिकांकडून तीनशे ते एक हजार रुपयांची लूट केली जात आहे. केंद्र व राज्य सरकारने विविध कामांसाठी आधार कार्ड संलग्न करणे बंधनकारक केले आहे. मात्र, शासनाची केंद्रे बंद आहेत. त्यामुळे महाऑनलाइन केंद्रांत आधार कार्ड काढण्यासाठी थंडीत पहाटे पाच वाजल्यापासून टोकन घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. त्यामुळे नागरिकांची ससेहोलपट होत आहे. 

शासनाची आधार नोंदणी केंद्रे बंद आहेत. त्यामुळे महाऑनलाइन केंद्रांत नोंदणी सुरू आहे. त्यांची संख्या तोकडी आहे; तसेच काही खासगी एंटरप्राइजेसमध्ये आधार कार्ड नोंदणी होते, तेथे आधार नोंदणीसाठी नमूद केलेल्या रकमेपेक्षा अव्वाच्या-सव्वा रक्कम उकळली जाते. त्यामुळे अशा केंद्रांना सोन्याचे दिवस आले आहेत. 

बुधवारी पहाटे पाच वाजता पाहणी केली असता, हडपसरमधील दोन्ही महाऑनलाइन केंद्रांवर थंडीच्या कडाक्‍यात लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वचजण ‘आधार’साठी टोकन घेण्यासाठी रांगेत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले. पंधरा ते वीस दिवस पुढील तारखेचे टोकन या केंद्रावर नागरिकांना दिले जात आहे. 

ससाणेनगर येथील लेन नंबर १२ मध्ये राज एंटरप्राइजेस आहे. येथे आधार कार्ड काढण्यासाठी तीनशे ते हजार रुपये नागरिकांकडून घेतले जात आहेत. त्यामुळे दिवसभरात नागरिकांचा आधार कार्डच्या पैसे घेण्यावरून वाद होतो. ज्या नागरिकाला आधार कार्ड ची गरज आहे. ते मागेल तेवढे पैसे देतात.

नागरिकांच्या प्रतिक्रिया 
ज्येष्ठ नागरिक प्रकाश चौगुले म्हणाले, ‘‘राज एंटरप्राइजेस येथील आधार केंद्रांवर नागरिकांची होणारी लूट थांबली पाहिजे. आधार नोंदणीसाठी नमूद केलेल्या रकमेपेक्षा अव्वाच्या-सव्वा रक्कम उकळली जाते, हे अन्यायकारक आहे.’’ 

नागरिक सरिता जाधव म्हणाल्या, ‘‘शासनाने हाताचे ठसे न उमटणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यांचे स्कॅनिंग करून आधार कार्ड देणार, आजारी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच सेवा मिळणार, घरपोच सेवेसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात येणार, असे जाहीर केले. मात्र, प्रत्यक्षात ही घोषणा कागदावरच आहे.’’ 

सायली कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘आधार नोंदणी झालेल्या नागरिकांची संख्या मोठी असली, तरी कार्डातील नावात, पत्ता, जन्मतारीख यामध्ये चुका झालेल्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. परिणामी, आधार कार्डातील चूक दुरुस्त करण्यासाठी नागरिकांना पुन्हा या केंद्रांचा आधार घ्यावा लागत आहे.’’

Web Title: pune news aadhar card Public loot from private support centers