पुण्याचा अभिषेक डोग्रा ‘नीट’मध्ये राज्यात पहिला 

पुण्याचा अभिषेक डोग्रा ‘नीट’मध्ये राज्यात पहिला 

पुणे - वैद्यकीय आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी झालेल्या ‘नीट’च्या निकालात पुण्यातील अभिषेक डोग्रा हा राज्यात पहिला, तर पुण्यातील रुचा हेर्लेकर ही देशात ३३ वे स्थान मिळवून राज्यात दुसरी आली आहे. 

देशपातळीवर पंजाबच्या नवदीप सिंगने अव्वल क्रमांक पटकावला. त्याने ७००पैकी ६९७ गुण मिळविले. मध्य प्रदेशच्या अर्चित गुप्ताने दुसरा आणि मनीष मुलचंदानीने तिसरा क्रमांक मिळविला.

देशातील अंदाजे ११ लाख ३८ हजार विद्यार्थ्यांनी ‘नीट २०१७’ची परीक्षा दिली. भारतातील सुमारे ४७० वैद्यकीय महाविद्यालयांमधील ६५ हजार १७० एमबीबीएस जागा आणि २५ हजार ७३० दंतवैद्यक (बीडीएस) जागांसाठी प्रवेशप्रक्रिया याच परीक्षेतील गुणांच्या आधारे होईल. नीट परीक्षा ही ७२० गुणांची असून, त्यापैकी ३६० गुण हे जीवशास्त्र व प्रत्येकी १८० गुण हे भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांसाठी आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या प्रवेशासाठी ४२५ पेक्षा अधिक गुणांची गरज असते.

अभिषेक म्हणाला, ‘‘दहावीपर्यंत टीव्ही, मोबाईल सगळे काही वापरले; पण बारावीला मात्र जरा गंभीर झालो. पहिल्या दिवसापासून अभ्यासाचे नियोजन केले. दररोज पाच ते सहा तास अभ्यास केला. अभ्यासाचे योग्य नियोजन केल्याने नीटमध्ये पहिल्या २० विद्यार्थ्यांत नंबर येईल, याची खात्री होती. देशात पाचवा क्रमांक मिळाला, याचा आनंद आहे.’’

कष्टाचे ‘चीज’ झाले
रुचाने परीक्षेतील यशाबद्दल आनंद व्यक्त केला. ती म्हणाली, ‘‘मला ६८० गुण मिळतील ही अपेक्षा होती; परंतु अखिल भारतीय श्रेणीची मात्र अपेक्षा नव्हती. नियमित अभ्यासासाठी घेतलेल्या कष्टांचे चीज झाले. मला मिळालेल्या गुणांचा विचार करता मला पुणे किंवा मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळेल; पण माझे प्राधान्य पुण्याला असेल.’’   

पुण्यातून सुमारे १८ हजार विद्यार्थ्यांनी या वर्षी नीट दिली. त्यातील अंदाजे ४०० विद्यार्थ्यांनी ३६० पेक्षा अधिक (५० टक्के) गुण मिळविले, तर अंदाजे ७५ विद्यार्थ्यांना ५०० किंवा त्याहून अधिक गुण मिळविता आले. २०१० मध्ये झालेल्या नीटचा विचार करता, हा निकाल खूप समाधानकारक आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या मनातून नीटची भीती निघून जात असल्याचे हे निदर्शक आहे. पहिल्या शंभरमध्ये रॅंक मिळालेल्या मुलांमध्ये महाराष्ट्रातील कमी विद्यार्थी असले, तरी ५० टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे, याकडे सकारात्मकपणे पाहिले पाहिजे.
- दुर्गेश मंगेशकर, संचालक, आयआयटीयन प्रशिक्षण केंद्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com