प्रत्येक मिळकतदाराचा विमा उतरविणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

पुणे - शहरातील प्रत्येक मिळकतदाराचा पाच लाख रुपयांचा अपघाती विमा महापालिका उतरविणार असून, त्यासाठीच्या निविदेला स्थायी समितीने बुधवारी मंजुरी दिली. येत्या आर्थिक वर्षापासून थकबाकी नसलेल्या मिळकतदारांसाठी ही योजना लागू होणार आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पुणे - शहरातील प्रत्येक मिळकतदाराचा पाच लाख रुपयांचा अपघाती विमा महापालिका उतरविणार असून, त्यासाठीच्या निविदेला स्थायी समितीने बुधवारी मंजुरी दिली. येत्या आर्थिक वर्षापासून थकबाकी नसलेल्या मिळकतदारांसाठी ही योजना लागू होणार आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

महापालिकेचा 2017-18 या वर्षाचा अर्थसंकल्प मांडताना ही योजना जाहीर केली होती. शहरात सुमारे 8 लाख मिळकती असून, त्यातील सुमारे साडेपाच लाख मिळकतदारांना या योजनेचा लाभ मिळेल, असे गृहीत धरले आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात 10 लाख रुपयांची तरतूद केली आहे. प्रत्यक्षात या योजनेसाठी 7 कोटी रुपये लागणार आहेत.

प्रतिमिळकतदारासाठी 85 रुपयांचा हप्ता महापालिका उतरविणार आहे. अपघातामध्ये अपंगत्व आले तरी संबंधितांना त्या प्रमाणात रक्कम मिळणार आहे. युनायटेड इन्शुरन्स या कंपनीमार्फत ही योजना राबविली जाणार आहे. मिळकतकराची थकबाकी नसलेल्या आणि मिळकतकराचा भरणा करणाऱ्यांना या योजनेचा वापर करता येणार असल्याचे मोहोळ यांनी स्पष्ट केले.

महाविद्यालयासाठी सल्लागार
महापालिकेचे वैद्यकीय आणि परिचारिका महाविद्यालय उभारण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याच्या प्रक्रियेला स्थायीने मंजुरी दिली. सुमारे 300 कोटी रुपये त्यासाठी खर्च होणार आहेत. वैद्यकीय आणि परिचारिका महाविद्यालयाचा आराखडा तयार करण्यापासून प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यापर्यंतची प्रक्रिया सल्लागारामार्फत पूर्ण करण्यात येईल, असे स्थायी समितीने स्पष्ट केले.

297 सीसीटीव्ही कॅमेरे
शहरात महापालिकेच्या विविध इमारतींवर 297 सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार आहेत. त्यासाठी एक कोटी 33 लाख रुपयांची निविदा स्थायीने मंजूर केली. महापालिकेच्या मिळकतींची सुरक्षितता जोपासण्यासाठी प्रशासनाने हा प्रस्ताव सादर केला होता.

लिफ्टसाठी 44 लाख
विश्रांतवाडी आणि कोथरूडमधील मृत्युंजयेश्‍वर मंदिराजवळील पादचारी पुलावरील लिफ्टच्या देखभाल- दुरुस्तीसाठी 44 लाख रुपयांची निविदा स्थायीने मंजूर केली. देखभाल-दुरुस्तीअभावी येथील लिफ्ट काही काळ बंद पडल्या होत्या. आता त्या सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पुतळ्यांची देखभाल, स्वच्छता
शहरातील सर्व पुतळ्यांची देखभाल करणे आणि तेथील स्वच्छता राखण्यासाठी सुमारे 89 लाख रुपयांच्या निविदेलाही मंजुरी देण्यात आली. शहरातील वेगवेगळ्या भागात सुमारे 250 हून अधिक पुतळे आहेत. आता त्या ठिकाणी नियमितपणे देखभाल आणि स्वच्छता होणार आहे. येत्या 15 दिवसांत याबाबतच्या कामाला सुरवात होणार आहे.

Web Title: pune news accident insurance wealthy municipal