आणखी किती बळी?

गुरुवार, 20 जुलै 2017

पुणे - शहरात काही विशिष्ट ठिकाणी वारंवार अपघात होत असताना आणि नागरिकांचे बळी जात असताना पोलिस आणि महापालिका प्रशासनाला जाग आलेली नाही. यावर्षी ८०७ अपघातांत १८३ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे या ठिकाणांवर आणखी किती बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येईल, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

पुणे - शहरात काही विशिष्ट ठिकाणी वारंवार अपघात होत असताना आणि नागरिकांचे बळी जात असताना पोलिस आणि महापालिका प्रशासनाला जाग आलेली नाही. यावर्षी ८०७ अपघातांत १८३ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे या ठिकाणांवर आणखी किती बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येईल, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

बाणेर रस्त्यावर दुभाजकावर भरधाव मोटार चढून झालेल्या अपघातात महिलेसह मुलीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर केवळ शंभर मीटरच्या परिसरात दुभाजक उभारण्यात आले. परंतु अजूनही या रस्त्यावर दुभाजकांची उंची कमी आहे. कर्वे रस्त्यावरील खंडुजीबाबा चौक ते वारजे तसेच पौड फाटा ते चांदणी चौक या रस्त्यावरील दुभाजकांची उंची कमी आहे. अंडी उबवणी केंद्र ते खडकी रेल्वे स्थानकादरम्यानच्या रस्त्यावरही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे काही पादचारी दुभाजकावरून रस्ता ओलांडतात. परिणामी अपघात होत आहेत. पौडहून कोथरूडच्या दिशेने येताना चांदणी चौकात अतितीव्र उतार आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात होत आहेत. 

मगरपट्टा येथील मुख्य प्रवेशद्वाराजवळ सिग्नल बसविण्यात आले. तसेच, दक्षिण प्रवेशद्वारावरील रस्त्यावरील पंक्‍चर काढण्यात आले आहे. मात्र, सीझन मॉलसमोर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्या ठिकाणी सिग्नल उभारणे आवश्‍यक आहे. केशवनगर मुंढवा जंक्‍शन येथे अपघात होत आहेत. कमी उंचीचे दुभाजक तसेच नदीपूल ते मुंढवा रेल्वे पुलादरम्यान रस्ता रुंदीकरण झाल्यास अपघात होणार नाहीत.  

पुणे-आळंदी रस्ता मॅगझीन चौक, डुक्‍कर खिंड चौकात रस्ता रुंदीकरणाचे काम झाले आहे. त्यामुळे तेथील अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु भूमकर चौक ते डांगे चौकादरम्यान अवजड वाहनांमुळे अपघात होत आहेत. या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचे काम झालेले नाही. दुभाजकांची उंची कमी आहे. बालेवाडी येथील राधा हॉटेलजवळ अपघातात नागरिकांचा बळी गेला आहे. सेवा रस्त्याने उलट्या दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे त्या ठिकाणी अपघात होत आहेत. 

दापोडी सीएमई प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावरही अपघातांचे प्रमाण वाढले आहे. बोपोडी ते दापोडीच्या दरम्यान वाहतूक कोंडीचे प्रमाण अधिक आहे. बोपोडी चौक ते खराडी रेल्वे स्थानकादरम्यान रस्त्यावर दुभाजक नाहीत. त्यामुळे या भागात अपघात होतात. तसेच, बोपोडी चौकातील रस्त्याचे रुंदीकरण करण्याचीही मागणी केली जात आहे.

उपाययोजना
- दुभाजकाची उंची वाढविण्याची गरज
- रस्ता रुंदीकरणाची आवश्‍यकता
- उलट्या दिशेने येणाऱ्या वाहनांवर कारवाईची गरज

शहरातील तीन आणि त्यापेक्षा अधिक अपघात झालेली ठिकाणे. 

पुणे-आळंदी रस्ता मॅगझीन चौक 
डुक्‍कर खिंड 
भूमकर चौक  
टेल्को रस्ता 
राधा हॉटेल, बालेवाडी  
सीएमई गेट, दापोडी  
सोलापूर रस्ता, द्राक्ष संशोधन केंद्रासमोर  
चांदणी चौक  
नवले पूल 
वडगाव पूल 
मगरपट्टा रस्ता
पुणे-कात्रज रस्ता- जुना कात्रज बोगदा
नवीन कात्रज बोगदा
मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर इंदिरा कॉलेजजवळ
मोशी टोलनाका
नाशिक फाटा चौक
अंडी उबवणी केंद्र

शहरात सतत अपघात घडणाऱ्या रस्त्यांचे ‘सेफ्टी ऑडिट’ करण्यात आले आहे. त्यानुसार सुमारे अडीचशे किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यात, पादचारी आणि वाहनचालकांचाही विचार केला आहे. रस्त्यांवरील अपघाताची कारणे आणि त्यात झालेली हानी या बाबींचा विचार करून उपाययोजना केल्या जातील. प्राथमिक टप्प्यातील कामे पुढील महिनाभरात होतील. तसेच, वाहतूक पोलिसांबरोबर चर्चा करूनही या ठिकाणी उपाययोजना करण्याचे नियोजन आहे.
- राजेंद्र राऊत, प्रमुख पथ विभाग, महापालिका

शहरातील अपघातग्रस्त ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहेत. वाहतूक शाखेतील संबंधित अधिकाऱ्यांना त्या रस्त्यावरील त्रुटी दूर करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्यासोबतच अपघातप्रवण ठिकाणी सूचना फलक बसविण्यात येणार आहेत. तसेच, वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
- अशोक मोराळे,  पोलिस उपायुक्‍त, वाहतूक

  खडी मशिन चौक 
पुणे-सोलापूर महामार्गावरील कात्रज-कोंढवा-येवलेवाडी आणि पिसोळीला जोडणाऱ्या खडी मशिन चौकात अवजड वाहनांची वर्दळ असते. उंड्री, पिसोळी, येवलेवाडी आणि सासवड भागात शहरीकरण वाढल्यामुळे दुचाकी आणि मोटारींच्या संख्येतही वाढ झाली आहे. हा संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून, या चौकात सतत अपघात होत आहेत. तेथील सिग्नल गेल्या काही महिन्यांपासून बंद आहेत. त्याकडे वाहतूक पोलिस आणि महापालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
उपाययोजना ः
 चौकांचे रुंदीकरण तातडीने करणे गरजेचे  
 पथदिवे सुरू करण्याची गरज
 चौकातील अतिक्रमणे दूर करणे आवश्‍यक

वडगाव पूल
वडगाव पुलाच्या डाव्या बाजूला पीएमपी आणि एसटी बसथांबा आहे. त्याच्यासमोरच खासगी वाहतूक करणारी वाहने आणि सहाआसनी रिक्षा थांबलेल्या असतात. पुलावरील कठडे तुटलेले आहेत. लेन कटिंग करून आणि वाहनचालकांकडून ओव्हरटेक करण्याचे प्रमाण अधिक आहे. काही महिन्यांपूर्वी या पुलावरून ट्रक उलटून सात नागरिकांचा बळी गेला होता. त्यानंतर काही प्रमाणात रस्त्याचे रुंदीकरण झाले असले तरी अद्याप या पुलाच्या सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.
उपाययोजना ः
 बेकायदा वाहतुकीवर नियंत्रण आणणे
 पीएमपी बस रस्त्याच्या कडेला थांबवाव्यात 
 दुभाजकावरील वायर रोपची दुरुस्ती करा

नवले पूल
मुंबई-बंगळूर बाह्यवळण महामार्गावर नवले पुलाच्या सुरवातीला साताऱ्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी असते. पुलावरील कठड्याची उंची कमी आहे. या पुलावरून कंटेनरमधील लोखंडी प्लेट्‌स खाली पडून दोघांचा बळी गेला होता. जांभुळवाडीच्या नवीन बोगद्यातून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवले पुलापर्यंत उतार आहे. त्यामुळे अपघाताचा धोका अधिक आहे. नवले पुलाच्या खाली महापालिका, नऱ्हे ग्रामपंचायत आणि महामार्ग प्राधिकरणाच्या वादात अद्याप सिग्नल बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वाहतूक धोकादायक झाली आहे.
उपाययोजना ः 
 प्रवाशांसाठी बसथांब्याची गरज
 रस्त्याच्या कडेला वायर रोपची गरज  
 नवले पुलाखाली सिग्नल यंत्रणा बसवा

Web Title: pune news accident road traffic