मोबाईलवरून शेतीपंप सुरू करता येणार!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

पुणे - अमेरिकेत वा जगात कुठेही बसून पुण्यातील वा अन्य कोणत्याही जिल्ह्यातील एखाद्या विहिरीवरील शेतीपंप सुरू किंवा बंद करता येतो, असे कुणी सांगितले, तर आश्‍चर्य वाटेल; पण पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील सी. टी. बोरा महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी हे उपकरण तयार करून त्याचा वापरदेखील सुरू केला आहे.

पुणे - अमेरिकेत वा जगात कुठेही बसून पुण्यातील वा अन्य कोणत्याही जिल्ह्यातील एखाद्या विहिरीवरील शेतीपंप सुरू किंवा बंद करता येतो, असे कुणी सांगितले, तर आश्‍चर्य वाटेल; पण पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील सी. टी. बोरा महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी हे उपकरण तयार करून त्याचा वापरदेखील सुरू केला आहे.

महाविद्यालयातील विद्यार्थी मनोज भाकरे, प्राध्यापक जितीन ठोकळे आणि प्राचार्य के. सी. मोहिते यांनी हे उपकरण तयार केले आहे. त्यामध्ये शेतीपंपाला बसविण्यासाठी एक किट तयार केले आहे. त्यात इन बिल्ट वायफाय बसविले असून, ते मोबाईलवरून कार्यान्वित करण्यासाठी ॲपही तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून इंटरनेटद्वारे जगाच्या पाठीवर कुठूनही शेतीपंप सुरू किंवा बंद करता येऊ शकतो.

विशेषत: ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू असतो. शेतीला पाणी देण्यासाठी रात्री-अपरात्री पंप सुरू करण्यासाठी शेतात जावे लागते. त्यात अनेक धोकेही असतात; परंतु या उपकरणामुळे पंप सुरू करण्यासाठी शेतात जाण्याची गरज लागणार नाही. घरात बसूनही तो सुरू करता येईल. सध्या शिरूरमधे भाकरे यांच्या शेतातील मोटारीला हे उपकरण जोडून त्याचा वापर सुरू करण्यात आला आहे. डॉ. के. सी. मोहिते म्हणाले, ‘‘उपकरणाच्या निर्मितीसाठी दहा हजार रुपये खर्च आला आहे. यात पाण्याच्या मोटारीची किंमत नाही. या तंत्रज्ञानाचे पेटंट मिळविण्यासाठी महाविद्यालयाने प्रयत्न सुरू केले आहेत. ते मिळाल्यानंतर उपकरणाची व्यावसायिक पद्धतीने निर्मिती सुरू करता येणार आहे. त्यामुळे उपकरणाची किंमत शेतकऱ्यांना परवडू शकेल, एवढ्या किमतीत उपलब्ध होऊ शकते. सध्या तीन आणि पाच हॉर्स पॉवरच्या मोटारींसाठी हे उपकरण वापरता येते.’’

शेतीपंप नियंत्रित करण्यासाठी ॲप तयार केले आहे. पंप सुरू किंवा बंद करण्याबराेबरच या उपकरणामुळे मोटारीची स्थिती काय आहे, ती सुरू करण्याची बटणे, सुरू किंवा बंद आहेत किंवा विहिरीत पाण्याची पातळी किती आहे, हेदेखील समजू शकते. त्यानुसार मोटार सुरू करायची की नाही, याचा निर्णय घेता येईल. पंप सुरू केल्यास तो किती सुरू ठेवायचा, याबाबत टायमरद्वारे वेळ निश्‍चित करता येईल.
- डॉ. के. सी. मोहिते, प्राचार्य, सी. टी. बोरा महाविद्यालय

Web Title: pune news agriculture pump start on mobile