सर्वच गड-किल्ल्यांचे संवर्धन व्हावे

गणेश कोरे
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधिस्थळ असलेल्या रायगड किल्ल्यासाठी विकास आराखडा प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी खासदार छत्रपती संभाजी शाहू महाराज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, हे प्राधिकरण केवळ रायगड किल्ल्यासाठी असून, ते राज्यातील सर्वच गड किल्ले संवर्धन आणि विकासासाठी असावे, अशी मागणी शिवप्रेमींकडून होत आहे.

पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधिस्थळ असलेल्या रायगड किल्ल्यासाठी विकास आराखडा प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी खासदार छत्रपती संभाजी शाहू महाराज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, हे प्राधिकरण केवळ रायगड किल्ल्यासाठी असून, ते राज्यातील सर्वच गड किल्ले संवर्धन आणि विकासासाठी असावे, अशी मागणी शिवप्रेमींकडून होत आहे.

रायगड किल्ला आणि परिसराच्या पर्यटनदृष्ट्या विकासासाठी कोकण विभागाचे तत्कालीन आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी सुमारे ६०० कोटींचा विकास आराखडा बनविला होता. या आराखड्याला राज्य शासनाने मंजुरी दिली. मात्र या विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यावी, अशी मागणी होत होती. त्यानुसार राज्य शासनाने रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाची स्थापना केली आहे. या प्राधिकरणावर शासनाच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांसह १७ विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती केली आहे.

याबाबत बोलताना प्रभाकर देशमुख म्हणाले, ‘‘जिल्हाधिकारी असताना शिवनेरी संवर्धन आणि विकास प्रकल्प गतीने पुढे नेण्याची संधी मिळाली होती. यानंतर कोकण विभागीय आयुक्त असताना रायगड किल्ला संवर्धन आणि विकासासाठीचा सुमारे ६०० कोटींचा विकास आराखडा बनविण्यात आला होता.

या आराखड्याला राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्याचा शासनाचा विचार होता. त्यानुसार छत्रपती संभाजी महाराजांच्या अध्यक्षतेखाली प्राधिकरण स्थापन करण्यात आले असून, प्राधिकरणाच्या माध्यमातून या प्रकल्पावर नियंत्रण राखण्यात येईल. विकासकामांच्या पहिल्या टप्प्यात समाधी स्थळ, जगदीश्‍वर मंदिर, राजदरबार, राजवाडा, जिजाऊंची समाधी आणि राजवाडा या वास्तूंचे संवर्धन करण्यात येणार आहे.

दरम्यान, प्राधिकरण केवळ रायगड किल्ल्यासाठी असू नये, तर राज्यातील प्रमुख महत्त्वाच्या किल्ले आणि संवर्धनासाठी महामंडळ असावे, अशी आमची मूळ मागणी असल्याचे जुन्नरच्या सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेचे अध्यक्ष संजय खत्री यांनी सांगितले. ‘‘याबाबत शासनाशी वारंवार पत्रव्यवहार केला आहे. आम्ही सादर केलेल्या महामंडळाच्या संकल्पनेवर आधारितच प्राधिकरणाची रचना असून, या प्राधिकरणाला राज्यातील इतर किल्ले संवर्धन आणि विकासाचा आराखडा आणि अंमलबजावणीचे अधिकार द्यावेत,’’ अशी मागणी खत्री यांनी केली आहे.

Web Title: pune news all fort security