दृष्टिहीन व्यक्तींचे स्थान कर्तृत्वावर - अमोल करचे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

पुणे - ""दृष्टिहीन व्यक्तींनी मेहनतीने आणि कर्तृत्वाच्या जोरावर वेगळे स्थान निर्माण केले आहे. आम्हीही काहीतरी करू शकतो, हा विश्‍वास त्यांनी समाजात रुजवला आहे. मी दृष्टिहीन असलो, तरी यावर मात करून मी क्रिकेटपट्टू झालो. क्रिकेटमुळे नाव मिळाले आणि जगण्याची उमेदही. त्यामुळे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत क्रिकेट खेळत राहीन,'' असे मत दृष्टिहीन क्रिकेटपट्टू अमोल करचे यांनी व्यक्त केले. 

आडकर फाउंडेशन आणि श्‍यामची आई फाउंडेशनतर्फे सामाजिक कार्यकर्त्या डॉ. हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त दिला जाणारा "डॉ. हेलन केलर स्मृती पुरस्कार' करचे यांना प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे ऍड. अभय आपटे आणि आडकर फाउंडेशनचे ऍड. प्रमोद आडकर उपस्थित होते. करचे म्हणाले, ""आई-वडील यांच्यामुळे मी शिकू शकलो. त्यांच्यामुळे मी आज क्रिकेटपट्टू बनू शकलो. मित्रांनीदेखील मला क्रिकेट खेळण्यास प्रोत्साहित केले. दृष्टिहीन व्यक्तींनी आत्मविश्‍वास बाळगला, तर तेही पुढे जाऊ शकतात.'' 

डॉ. संचेती म्हणाले, ""दृष्टिहीन असूनही त्यावर मात करत क्रिकेटमध्ये यश मिळविणाऱ्या अमोल यांच्याकडून जगणे शकले पाहिजे. आयुष्य जगताना माणसांमध्ये विनम्रता आणि कृतज्ञता असली पाहिजे; तसेच सकारात्मक दृष्टिकोन असायला हवा. प्रत्येकात सुप्त गुण दडलेले असतात त्याचा शोध घेतला पाहिजे.'' ऍड. आपटे म्हणाले, ""प्रतिकूल परिस्थितीतून यश मिळविणाऱ्या व्यक्तीचा प्रवास आपल्याला सकारात्मक जगण्यास प्रोत्साहित करत असतो. दिव्यांग खेळाडूकडून आपण स्फूर्ती घेतली पाहिजे.'' सूत्रसंचालन प्रज्ञा गोडबोले यांनी केले. भारत देसडला यांनी आभार मानले. 

राज्य सरकारकडून डोळस क्रिकेटपटूंसाठी सोयीसुविधा दिल्या जातात; पण दिव्यांग खेळाडूंच्या बाबतीत तसे होताना दिसत नाही. आम्ही सर्वजण भारताचे प्रतिनिधित्व करतो, मग प्रत्येकाला समान वागणूक का नको? 
-अमोल करचे, क्रिकेटपटू 

Web Title: pune news amol karche