गाणं "दिसायला' नको... ते "जाणवायला' हवं 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

अन्‌ टेबल झाला तबला 
"सकाळ'च्या या उत्तरोत्तर रंगत गेलेल्या मैफलीत संगीताचे हे तीन दिग्गज उपासक असले, तरीही वाद्यं मात्र कुठलीही नव्हती; पण वाद्यं नसणं ही यापैकी कुणालाही मर्यादा वाटली नाही. डॉ. सलिल कुलकर्णी यांनी तर बसल्याबसल्या टेबलवरच ताल धरत भाटे आणि अभ्यंकरांना संगीतसाथ द्यायला सुरवात केली. या वेळी टेबल देखील तबला होऊ शकतो, हा सुखद साक्षात्कार अनेकांना झाला. शिवाय, तिघांमधील मैत्रीचं नातंही अनुभवता आलं.

पुणे - आपल्या अमूर्त पण अद्‌भुत अनुभूतीने अवघ्या सृष्टीचं मूर्तरूप व्यापून असणारी कला म्हणजे संगीत. अशा या संगीतकलेसाठी, तिच्या साधनेसाठी वाहिलेला जागतिक संगीत दिन एकीकडे साजरा होत असावा... दुसरीकडे नुकत्याच झालेल्या पालख्यांच्या प्रस्थानानंतर एक हवाहवासा पावसाळी गारवा पुण्याने पांघरलेला असावा... आणि अशा या "परफेक्‍ट कॉम्बिनेशन'ला जोड असावी ती डॉ. सलिल कुलकर्णी, संजीव अभ्यंकर आणि आनंद भाटे यांच्या सुरेल गप्पांची !... पुढचं काही सांगण्याआधीच अनेकांच्या ओठी "व्वा' आणि "आहाहा' उमटलं नाही तरच नवल ! 

बुधवारी जागतिक संगीत दिनाच्या मुहूर्तावर हे "परफेक्‍ट कॉम्बिनेशन' प्रत्यक्षात जुळून आलं आणि पाहतापाहता पुढच्या तासाभराच्या गप्पांच्या त्या मैफलीने सगळ्यांनाच एका अलौकिक अशा संगीतसफरीवर नेलं. "सकाळ'ने आयोजिलेल्या या गप्पा हजारो रसिक- श्रोते आणि या तीन दिग्गजांच्या चाहत्यांनी "सकाळ फेसबुक लाइव्ह'च्या माध्यमातून थेट अनुभवल्या. आपले आवडते गायक- संगीतकार थेट आपल्याशी गप्पा मारायला आलेले पाहून त्यांच्या या दूरस्थ "ऑनलाइन' चाहत्यांनी या प्रत्येकाला अनेक प्रश्न विचारत, खुमासदार "कमेंट्‌स' देत आणि संगीताबद्दलच्या काही फर्माईशी करत या गप्पा अधिकच "लाइव्ह' केल्या... अन्‌ मग पाहतापाहता या सगळ्यांच्या सोबतीने कधी "यमन' येत गेला, कधी "मालकंस', कधी "मारवा' उपस्थितांना अंतर्मुख करत गेला, तर कधी काही देखण्या बंदिशी आणि अभंग सर्वांना क्षणात खुलवत मैफल अधिकाधिक उंचीवर नेत राहिले... 

गप्पांची सुरवात झाली ती संगीत आणि मनःशांती यांतील परस्पर अन्वय उलगडू पाहणाऱ्या प्रश्नाने. आजच्या धकाधकीच्या जीवनातल्या ताणतणावांवर संगीत हे उत्तर कसं ठरू शकतं, यावर हे तिघे बोलले. ""कुणालाही एखाद्या लहान बाळाइतकं निरागस करू शकण्याची ताकद संगीतात आहे,'' असं कुलकर्णी यांनी सांगितलं. तर, संगीत हे खरं "स्ट्रेसबस्टर' असल्याचं मत भाटे यांनी आवर्जून मांडलं. अभ्यंकर यांनी संगीताच्या सकारात्मक असण्याकडे लक्ष वेधलं. 

सुरांची शक्ती आणि आलापातलं नितळ- निखळ सच्चेपण यावर अभ्यंकर यांनी मोठ्या खुबीने विवेचन केलं. आलापात जात्याच असणारा ठेहराव, त्यात असलेली एकाग्रचित्त होण्याची क्षमता आणि त्यातून गाणाऱ्या- ऐकणाऱ्या अशा दोघांना गवसणारी आत्मिक एकतानता हे त्यांनी काही आलाप गाऊन उलगडून दाखवलं. 

संगीतात भावोत्कटतेने गाणं हे महत्त्वाचं ठरतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आवाज आहे म्हणून तो कसाही वापरणं हे गायनसाधनेत अपेक्षित नाही. आवाजाला नियंत्रित फेक आवश्‍यक ठरते. हे नियंत्रणच आपलं गाणं अधिक उंचीवर नेत असतं. गाणं "दिसायला' नको, तर ते "जाणवायला' हवं, असंही मत या वेळी व्यक्त झालं. रसिकांसाठी संगीत साक्षरता गरजेची असल्याचं मत या तिघांनी आवर्जून नोंदवलं. संगीताचं रसग्रहण अधिक घडू लागलं, तर गाणं ऐकणाऱ्यासाठी तो अनुभव अधिक आस्वादक ठरतो. त्यामुळे, गाणं कळणं हे आवश्‍यक नसलं, तरी ते जमलं तर उत्तम... प्रश्न-उत्तरं आणि त्यांचा आस्वाद असाच सुरू राहिला. सुमारे तासभर रंगत गेलेल्या या मैफलीचा शेवट अभंग आणि त्यानंतर झालेल्या भैरवीने झाला. 

ताना घेणं म्हणजे गाणं नव्हे ! 
गाताना अधिकाधिक ताना घेऊन आपली "तयारी' दाखवणं म्हणजे काही गाणं नव्हे. खऱ्या गाण्यात आत्मशोध अपेक्षित आहे. तानबाजीमधून तो येत नाही. त्यामुळे गाण्याची साधना करणाऱ्यांनी ताना घेत गाणं कमीतकमी करायला हवं, तरच ते गाणं मनाला रुंजी घालतं. मैफलीनंतर असं गाणं घरी घेऊन जाता येतं... सूर कुठला लावलाय, याहीपेक्षा तो कसा लावलाय, यावर गाण्याचं "भावणं' ठरतं. पण, सुरांना शरण गेल्यानंतरचं गाणं हे खरं गाणं, असं महत्त्वाचं निरीक्षण या वेळी नोंदवलं गेलं. 

Web Title: pune news Anand Bhate, Sanjeev Abhyankar, Salil Kulkarni