आठवले हे समाजाला नको असलेले नेते - आनंदराज आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

पुणे - 'कोरेगाव भीमा येथील दंगलीनंतर राज्यभरात पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला; परंतु त्यानंतर ऐक्‍याची चर्चा ही व्यर्थ आहे. मुळात "रिपब्लिकन ऐक्‍य' हा संपलेला विषय आहे. सध्या काही रिपब्लिकन नेत्यांचे फक्त धड असून, त्यांचे डोके भलत्याच लोकांचे आहे. जनाधार संपल्यामुळे रामदास आठवले ऐक्‍याची साद घालत आहेत; परंतु ते समाजाला नको असलेले नेते असल्याची टीका रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केली.

वढू बुद्रुक, कोरेगाव भीमा आणि सणसवाडी येथे त्यांनी ग्रामस्थांची भेट घेतली; तसेच वढू येथील गोविंद गायकवाड यांच्या समाधीसह कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला भेट दिली. या वेळी पोलिस अधीक्षक सुवेझ हक आणि अतिरिक्त अधीक्षक संदीप पखाले यांची भेट घेऊन दंगलप्रकरणी तपासाची माहिती घेतली. त्या संदर्भात त्यांनी पुण्यातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली.

आंबेडकर म्हणाले, 'सत्तेत असलेले आठवले सत्तेच्या परीघाबाहेर राहू शकत नाही. जनाधार संपल्याने त्यांनी ऐक्‍याचे नाटक पुन्हा सुरू केले आहे. त्यामुळेच औरंगाबाद येथील त्यांची सभा आंबेडकरी जनतेने उधळून लावली.''

कोरेगाव भीमा दंगलीबद्दल माहिती मिळविण्यात राज्य सरकारची गुप्तचर यंत्रणा कुचकामी ठरल्यामुळे हा प्रकार घडला. खऱ्या दंगेखोरांना अटक करण्याऐवजी हे प्रकरण नक्षलवाद्यांशी जोडून सरकार मूळ आरोपींवरील लक्ष विचलित करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. या दंगलीमागे असलेल्या संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई करावी; तसेच संबंधित व्यक्ती व संघटनांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावेत. राज्य सरकारची या प्रकरणातील भूमिका संशयास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

"विजयस्तंभाला पोलिस संरक्षण द्या'
कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला संरक्षण देण्यासाठी त्या ठिकाणी कायमस्वरूपी पोलिस चौकी उभारणे गरजेचे आहे; तसेच "महाराष्ट्र बंद'च्या दरम्यान कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागण्या करणार असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले.

Web Title: pune news anandraj ambedkar talking