मुलांनो, जीवनाच्या बोर्डात यशस्वी व्हा - अविनाश धर्माधिकारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

पुणे - ‘‘प्रत्येक विद्यार्थाने आपला सूर ओळखावा आणि आपल्या जीवनाचे गाणे आपल्याच सुरात गावे. दुसऱ्याचा सूर पाहून आपला सूर ठरवू नये,’’ असा सल्ला माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी दिला. दहावी-बारावीला बोर्डात येणे म्हणजे खरे यश नाही. जीवनाच्या बोर्डात यशस्वी होण्याचे ध्येय बाळगा, असेही ते म्हणाले.

पुणे - ‘‘प्रत्येक विद्यार्थाने आपला सूर ओळखावा आणि आपल्या जीवनाचे गाणे आपल्याच सुरात गावे. दुसऱ्याचा सूर पाहून आपला सूर ठरवू नये,’’ असा सल्ला माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी दिला. दहावी-बारावीला बोर्डात येणे म्हणजे खरे यश नाही. जीवनाच्या बोर्डात यशस्वी होण्याचे ध्येय बाळगा, असेही ते म्हणाले.

सकाळ विद्या आणि चाणक्‍य मंडलच्या वतीने आयोजित ‘दहावी-बारावी नंतरचे करिअर’ या व्याख्यानात धर्माधिकारी बोलत होते. ‘यूपीएससी’तील टॉपर विश्‍वांजली गायकवाड आणि सूरज जाधव यांनीही विद्यार्थी, पालकांशी संवाद साधला. या वेळी गणेश कला क्रीडा रंगमंच तुडुंब भरले होते.
धर्माधिकारी म्हणाले, ‘‘आपण सहजपणे कशात रमतो, ते आपले खरे क्षेत्र आहे. त्यासाठी आधी ‘स्व’ची ओळख होणे गरजेचे आहे. त्यानंतर आवडीनुसार क्षेत्र निवडता येते; पण क्षेत्र निवडल्यानंतर त्यात अव्वल, उत्तम आणि प्रतिभावंत होणे महत्त्वाचे आहे. कागदावरील गुणांना फारसे महत्त्व देऊ नका. कागदावरचे चांगले गुण म्हणजे खरी गुणवत्ता हे समीकरण खोटे आहे. अभ्यासाव्यतिरिक्त अभिनय, नृत्य, गायन यातही काही मुले बुद्धिवान असू शकतात. त्यामुळे आवडीनुसार क्षेत्र निवडले पाहिजे.’’

परीक्षेत कमी गुण पडले, अभियांत्रिकी-वैद्यकीय शाखेला प्रवेश मिळाला नाही, हवे ते महाविद्यालय मिळाले नाही म्हणून नाराज होऊ नका. आज ज्यांच्याकडे मोठी माणसे म्हणून आपण पाहतो, त्यांनी त्यांच्या जीवनात आधी प्रचंड संघर्ष केलेला आहे. अपमान, निराशा भोगलेली आहे. अशा व्यक्तींचा आदर्श समोर ठेवा, असेही त्यांनी सांगितले. 

‘आपण कोण आहोत’, हे आधी ओळखणे गरजेचे आहे. मग ‘जीवनात काय व्हायचे आहे’, हे नीट समजू शकेल. मी दहावी-अकरावीत असतानाच स्पर्धा परीक्षा द्यायची, असा निर्णय घेतला होता. त्यानुसार अकरावीत असताना फाउंडेशन कोर्स लावला, असे ठरवणे महत्त्वाचे असते.
- विश्वांजली गायकवाड, यूपीएससी टॉपर

मुलांना अभ्यासक्रम किंवा करिअर निवडण्याची पालकांनी संधी द्यावी. त्यांच्याशी संवाद साधावा. त्यांच्यावर स्वतःच्या अपेक्षा, ओझे लादू नये. तरच मुलांना आकाशात मुक्त भरारी घेता येईल. मुलांच्या मनातही बऱ्याच अपेक्षा असतात; पण योग्य काय, हे वेळीच कळायला हवे.
- सूरज जाधव, यूपीएससी टॉपर

Web Title: pune news avinash dharmadhikari talking