बाजीराव रस्त्यावर कारवाईचा दणका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

पुणे - बाजीराव रस्त्यावरील वाहतूक कोंडीबाबत मंगळवारी ‘सकाळ’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची पोलिस उपायुक्‍तांनी गांभीर्याने दखल घेत ‘नो पार्किंग’सह नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी या रस्त्यावर धडक कारवाई सुरू केली. या रस्त्यावरील कोंडी दूर करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलिस उपायुक्‍त अशोक मोराळे यांनी दिली.

पुणे - बाजीराव रस्त्यावरील वाहतूक कोंडीबाबत मंगळवारी ‘सकाळ’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची पोलिस उपायुक्‍तांनी गांभीर्याने दखल घेत ‘नो पार्किंग’सह नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी या रस्त्यावर धडक कारवाई सुरू केली. या रस्त्यावरील कोंडी दूर करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलिस उपायुक्‍त अशोक मोराळे यांनी दिली.

पुरम चौक ते शनिवारवाडा डॉ. हेडगेवार चौकापर्यंत बाजीराव रस्त्यावर दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक आणि पादचारी त्रस्त झाले आहेत. येथील वाहतूक कोंडीची कारणे आणि त्यावरील उपाययोजनांबाबत ‘सकाळ’ने मंगळवारी सर्वेक्षण केले. त्यात बाजीराव रस्त्यावर दुतर्फा वाहनांचे पार्किंग, माल उतरविण्यासाठी दारात वाहने उभी करणारे दुकानदार, पदपथावरील अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालक, विरुद्ध दिशेने येणारी वाहने आणि उपरस्त्यांवरील एकेरी मार्गाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांमुळे कोंडी होत असल्याचे निदर्शनास आले. 

विश्रामबाग आणि खडक वाहतूक पोलिसांसोबत स्थानिक दुकानदारांची बैठक घेण्यात येणार आहे. या रस्त्यावर सकाळी आठ ते रात्री आठ यादरम्यान जड वाहतुकीला बंदी घालण्यात येणार आहे. तसेच, वाहंनाच्या वर्दळीच्या कालावधीत माल उतरविण्यासाठी दुकानचालकांनी दारात वाहने उभी करू नयेत, यासाठी अधिसूचना काढण्यात येणार आहे.

पदपथावरील अतिक्रमण हटविल्यास पादचाऱ्यांना चालण्यास जागा मिळेल. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांना अडथळा येणार नाही. पादचाऱ्यांनीही घाई न करता सिग्नल लागल्यानंतरच रस्ता ओलांडावा. 
- डी. डी. शिर्के, पोलिस उपनिरीक्षक 

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. त्यासाठी वाहतूक पोलिसांचे विशेष पथक नेमण्यात येईल. महापालिकेच्या मदतीने पदपथावरील अतिक्रमण दूर करण्यात येईल. या रस्त्यावर पट्टे आखून घेण्यात येतील. तसेच नो पार्किंगमध्ये वाहने लावणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांचे छायाचित्र घेऊन ते प्रसिद्धीस देण्यात येतील.
- अशोक मोराळे,  वाहतूक पोलिस उपायुक्‍त

लोकांची मानसिकता बदलणार नाही, तोपर्यंत अशीच स्थिती राहणार. लोकांनी स्वत:हून नियम पाळले पाहिजेत. प्रत्येकाने जबाबदारीने वाहन चालवले पाहिजे. सिग्नल असताना पोलिसांची गरजच नाही. वाहनचालक कारवाई करण्याची वेळ आल्यास पोलिसांशी हुज्जत घालतात, हे प्रामुख्याने बंद झाले पाहिजे. 
- ज्योतिकुमार कदम, वाहतूक पोलिस

‘नो एंट्री’च्या ठिकाणी पोलिस नेमले पाहिजेत. वन-वे आणि पार्किंगचे फलक मोठ्या आकाराचे असावेत. शनिपार चौकातील रिक्षा नियमांविरुद्ध लावल्या जातात. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. 
-राजेंद्र सुगंधी, स्थानिक दुकानदार

लोकांनी खासगी वाहनांचा वापर शक्‍यतो टाळावा. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर केल्यास बाजीराव रस्त्यावरील कोंडीचा प्रश्‍न सुटेल. वाहतुकीचे नियम पाळण्याची सवय सर्वांनीच लावून घेतली पाहिजे. 
- संतोष चव्हाण, नागरिक 

शाळा सुटल्यावर पालकांनी स्वत:च्या गाड्या योग्य ठिकाणी पार्क करून पाल्याला घेऊन जावे. रस्त्याच्या मधोमध गाड्या लावून पाल्याची वाट पाहू नये. ‘नो एंट्री’येणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे. 
- दिलीप जावळे, रिक्षाचालक 
वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे. पोलिस आपले काम प्रामाणिकपणे करत असले, तरी लोक त्यांच्याशी उद्धटपणे वागतात. ते बंद झाले तर बरेच प्रश्‍न सुटू शकतात. बाजीराव रस्त्यावर सतत वीज जाते, त्यामुळे सिग्नल बंद पडतात. त्याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. 
- मुकुंद भेलके,  स्थानिक दुकानदार

Web Title: pune news bajirao road traffic sakal news impact