esakal | Pune: काँग्रेसचा युटर्न, महापालिका निवडणुकीसाठी आघाडीची तयारी
sakal

बोलून बातमी शोधा

बाळासाहेब थोरात

पुणे : काँग्रेसचा युटर्न, महापालिका निवडणुकीसाठी आघाडीची तयारी

sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याची भाषा काँग्रेसकडून केली जात असताना आता या भूमिकेवरून पक्षाने युटर्न घेतला आहे. भाजपला हरविण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

पुण्यात कार्यक्रमानिमित्त आलेले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आगामी महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. यापूर्वी कॉंग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील याबाबत अनेकदा महापालिका निवडणुका स्वबळावर लढवणार असे सांगितलेले आहे. मात्र, तीनचा प्रभाग झाल्यानंतर काँग्रेसची भूमिका बदलली आहे का असा प्रश्‍न थोरात यांना विचारण्यात आला त्यावेळी ते म्हणाले, ‘‘काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत. आम्ही एकत्र राज्य सरकारमध्ये आहोत. चांगल्या पद्धतीने सरकार चालवत असून, आम्ही एकत्रच आहोत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हा आमचा उद्देश आहे. ज्या ठिकाणी आम्हाला शक्य आहे तेथे आम्ही एकत्रच जात आहोत.

हेही वाचा: ग्वालियार : बस कंटेनरच्या धडकेत ७ जणांचा मृत्यू, १५ गंभीर

तीनचा प्रभाग रचनेबद्दल थोरात म्हणाले, ‘‘महापालिका निवडणुकीबद्दल आमच्यात मतमतांतरे होते, पण मंत्रीमंडळाच्या बैठकीत आमच्यात चर्चा झाली, पण वाद झालेला नाही. प्रभाग रचनेकडे पक्षिय दृष्टिकोनातून बघू नये, हे निर्णय फक्त सत्ताधाऱ्यांच्या फायद्याच्या नाहीत तर सर्वांच्या फायद्याचा आहे. निवडणुकीमध्ये जास्त जणांना सामावून घेता यावे यासाठी तीनचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला पक्षिय स्वरूप नाही.

आकडेवारी आल्यानंतर ओल्या दुष्काळाचा निर्णय

कोकणाला चक्रीवादळाचा फटका बसला त्यांनतर आता मराठवाड्यासह इतर जिल्ह्यात फटका बसला आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. कालपर्यंत पाऊस सुरू होता, आज पाऊस थांबल्याने त्यामध्ये नुकसानीचे स्वरूप, त्याची आकडेवारी एकत्र केली जात आहे. ही आकडेवारी आल्यानंतरच ओला दुष्काळ जाहीर करण्याचा व शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. वीमा कंपन्या जर शेतकऱ्यांना पाण्यात जाऊन फोटो काढा तरच मदत मिळेल असे सांगत असतील तर ते चुकीचे आहे, अशा शेतकऱ्यांनी तक्रार करावी, असे थोरात यांनी सांगितले.

loading image
go to top