दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासन आग्रही

मिलिंद संगई
गुरुवार, 15 जून 2017

शासनाने याबाबत मुख्याध्यापकांसह इतर प्रमुखांना जबाबदार धरणार असल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षात प्रत्येक शाळेला विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे कमी करण्याबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्या लागतील असे दिसते. 

बारामती : शालेय वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी आग्रही असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. आज शासनाने एक परिपत्रक जारी करुन दप्तरांच्या ओझ्यातून विद्यार्थ्यांची सुटका होण्यासाठी शाळास्तरावरुन सर्वंकष प्रयत्न करण्यात यावेत, या मध्ये कसूर करणा-यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. 

आज जारी केलेल्या परिपत्रकात प्रत्येक महिन्यात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या कार्यालयाने विद्यार्थ्यांच्या दप्तरांची तपासणी करावी व त्यांनी त्यांचा अहवाल शिक्षण संचालकांना सादर करावा. त्या नंतर सर्व जिल्ह्यांचा एकत्रित अहवाल दर महिन्याच्या 15 तारखेस शासनास सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत. 
दप्तरांचे ओझे कमी करण्यासंदर्भात शाळा करीत असलेल्या विविध पर्यायांची माहिती शासनास सादर करण्यासोबतच ज्या शाळांकडून अशा उपाययोजना होणार नाहीत अशा शाळांच्या दैनंदिन कामकाजात लक्ष घालणा-या व नियामक मंडळाने नामनिर्देशित केलेल्या एका संचालकास व शाळेच्या मुख्याध्यापकांना या बाबत जबाबदार धरण्यात यावे असे स्पष्ट निर्देश या परिपत्रकात देण्यात आले आहेत. 

शासन गंभीर
दप्तरांचे ओझे कमी व्हावे या साठी नोव्हेंबर 2015 मध्ये शासनाने धोरण निश्चित केले होते. त्या अनुसार शाळांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी उपाययोजना हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. प्रत्यक्षात शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागात हे निर्देश कागदावरच राहिले, अपवादात्मक शाळा वगळता इतर ठिकाणी वजनदार दप्तरे पाठीवर वागवतच मुले शाळेत जाताना दिसत आहेत. 
आता मात्र शासनाने याबाबत मुख्याध्यापकांसह इतर प्रमुखांना जबाबदार धरणार असल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षात प्रत्येक शाळेला विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे कमी करण्याबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्या लागतील असे दिसते. 

Web Title: pune news baramati news school baggage