‘ससून’मध्ये बॅटरीवर चालणारी गाडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

पुणे - रुग्णाला तातडीने एका ठिकाणाहून दुसरीकडे हलविण्यासाठी ससून रुग्णालयात बॅटरीवर चालणारी गाडी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सिटी स्कॅन, एक्‍स रे काढण्यासाठी रुग्णाची होणारी गैरसोय कमी होणार असून, गर्भवतींनाही विनासायास प्रसूती कक्षापर्यंत घेऊन जाता येईल. खासदार वंदना चव्हाण यांच्या खासदार निधीतून ही गाडी विकसित केली आहे.

ससून रुग्णालयात दररोज १२०० ते १३०० रुग्ण दाखल असतात. त्यातील काही रुग्णांना वेगवेगळ्या तपासण्या करण्यासाठी वॉर्डमधून तपासणी केंद्रावर घेऊन जावे लागते. त्यासाठी व्हीलचेअर, स्ट्रेचरचा वापर केला जात असे. रुग्णांच्या नातेवाइकांचा हा त्रास कमी करून रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी बॅटरीवर चालणारी गाडी विकसित करण्यात आली आहे. त्यासाठी वंदना चव्हाण यांनी त्यांच्या खासदार निधीतून मदत दिली, अशी माहिती बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली.

चव्हाण म्हणाल्या, ‘‘ससून रुग्णालयातील काही वॉर्ड लांब आहेत. तेथील रुग्णांना तपासण्यासाठी चालत किंवा स्ट्रेचरवरून घेऊन जाणे शक्‍य नाही. अशा वेळी बॅटरीवरील गाडी निश्‍चित उपयुक्त ठरेल, हे विचारात घेऊन बॅटरीवरील गाडी दिली आहे.’’

वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे म्हणाले, ‘‘बॅटरीवर चालणाऱ्या दोन गाड्या सध्या रुग्णालयात कार्यान्वित आहेत. गर्भवतींना किंवा नवजात अर्भकांना वॉर्डमध्ये हलविण्यासाठी त्याचा पूर्ण क्षमतेने वापर होत आहे.’’

Web Title: pune news battery vehicle in sasoon