टोळक्‍याच्या मारहाणीत चालकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

कात्रज नवीन बोगद्याजवळ त्यांच्या चारचाकीने दुसऱ्या चारचाकीला कट मारला. त्या वाहनातील व्यक्तींनी त्यांना नऱ्हे येथे थांबवून जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे दोघेही चारचाकी घेऊन सुसाट निघून गेले. त्यांना वडगाव-बुद्रुक येथे गाडी आडवी घालून थांबविले. पाचही जणांनी "तुम्ही कट मारल्यामुळे आम्ही अपघात होऊन मेलो असतो', असा दम भरला

पुणे/खडकवासला - चारचाकी वाहनातून दोघेजण सातारा येथे जात होते. त्या वेळी दुसऱ्या चारचाकी वाहनाला कट बसल्याच्या कारणावरून पाच जणांनी केलेल्या मारहाणीत चालकाचा मृत्यू झाला. या संदर्भात प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती.

अजयसिंह ऊर्फ आबा उत्तम गोडसे (वय 38, रा.मु.पो. वडूज, सातारा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांचे मित्र समीर अत्तार (कर्मवीरनगर, वडूज, ता. खटाव, जि. सातारा) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आरोपी राहुल ऊर्फ मनोज बाळासाहेब मते (वय 23, रा. मतेनगर, धायरी), समीर रमेश पोकळे (वय 36, रा. जय महाराष्ट्र मंडळाजवळ, धायरीगाव), गणेश अंकुश रायकर (वय 26, रा. काळुबाई चौक, रा. रायकरमळा, धायरीगाव), राजेश आत्माराम पोकळे (वय 28, लव-कुश बिल्डिंग, धायरीगाव) आणि नितीन ज्ञानोबा पोकळे (वय 25, रा. राजलक्ष्मी बंगला, पोकळे वस्ती, धायरी) या पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला. न्यायालयाने त्याना 19 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मयत मित्र अभयसिंह हे दोघे मूळचे वडूज येथील आहेत. "चायनीज'चा व्यवसाय सुरू करण्यासाठी ते पुण्यामध्ये चांदणी चौकात चायनीज बनवणाऱ्या आचाऱ्याला भेटण्यासाठी 6 ऑक्‍टोबरला आले होते. कात्रज नवीन बोगद्याजवळ त्यांच्या चारचाकीने दुसऱ्या चारचाकीला कट मारला. त्या वाहनातील व्यक्तींनी त्यांना नऱ्हे येथे थांबवून जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे दोघेही चारचाकी घेऊन सुसाट निघून गेले. त्यांना वडगाव-बुद्रुक येथे गाडी आडवी घालून थांबविले. पाचही जणांनी "तुम्ही कट मारल्यामुळे आम्ही अपघात होऊन मेलो असतो', असा दम भरला. तेथील लोखंडी रॉड व लाकडी बाबूने जबर मारहाण केली. गाडीचे बोनेट व काचा फोडल्या.

दरम्यान, फिर्यादीने त्याही अवस्थेत गाडी चांदणी चौकापर्यंत नेली. तेथे गाडी चालविताना चक्कर आली. तेथील एका व्यक्तीने त्यांच्या गाडीची कागदपत्रे घेऊन त्यावरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. त्यातील एक क्रमांक वडूज येथे त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीला लागला. यामुळे वडूज येथून फिर्यादीच्या ओळखीच्या व्यक्ती त्यांना घेण्यासाठी आल्या. या दोघांनाही वडूजवरून आलेल्या व्यक्ती गाडीत घालून परत गावाकडे घेऊन चालले होते. दोघांनाही मुक्का मार लागला होता; तसेच अभयसिंह आलेल्या व्यक्तींशी बोलत होता. त्यामुळे त्यांना गंभीर मार लागला असेल, असे कोणाला वाटले नाही.

दरम्यान, गाडी वडूजजवळ आल्यावर रात्री दोनच्या सुमारास अभयसिंह याची हालचाल बंद झाली. त्यांना रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला "मयत' घोषित केले. वडूज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तेथून "झिरो नंबर'ने सिंहगड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

दरम्यान, शवविच्छेदनाचा अहवालात अभयसिंहचा मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर फिर्याद घेऊन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अज्ञात पाच व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू जगताप तपास करीत आहेत.

Web Title: pune news: beating death crime