कर्तृत्वाचा ठसा उमटविणाराच खरा मंत्री - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

पुणे - ""अनेक वर्षे मंत्री म्हणून राहण्यापेक्षा मर्यादित काळातसुद्धा जो आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कर्तृत्वाचा ठसा उमटवितो, तो खरा मंत्री असतो. भाई वैद्य यापैकी एक होते,'' असे गौरवोद्‌गार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी बुधवारी येथे काढले. समाजवादी विचारांचा आग्रह घेऊन भाई पुढे जात आहेत. मात्र, अशी माणसे कमी होत चालली आहेत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 

पुणे - ""अनेक वर्षे मंत्री म्हणून राहण्यापेक्षा मर्यादित काळातसुद्धा जो आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कर्तृत्वाचा ठसा उमटवितो, तो खरा मंत्री असतो. भाई वैद्य यापैकी एक होते,'' असे गौरवोद्‌गार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी बुधवारी येथे काढले. समाजवादी विचारांचा आग्रह घेऊन भाई पुढे जात आहेत. मात्र, अशी माणसे कमी होत चालली आहेत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा आणि संवाद यांच्यातर्फे आयोजित समारंभात ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी मंत्री भाई वैद्य यांचा 90व्या वाढदिवसानिमित्ताने पवार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, अंकुश काकडे, संस्थेचे कार्याध्यक्ष सचिन इटकर, सुनील महाजन उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ""आमचे मंत्रिमंडळ गमतीशीर होते. सत्तेच्या प्रांगणात नसलेले आणि आपण मंत्री होऊ असा विचार कधीही न केलेले लोक मंत्री झाले होते. त्यांना कोणी ओळखत नव्हते, अशी स्थिती होती. ते मंत्रिमंडळ दोन- अडीच वर्षांचे, अल्पायुषी ठरले. मात्र, निर्णय घेण्यात फार सक्षम होते. महाराष्ट्रातील महत्त्वाचे निर्णय त्या काळात घेतले गेले. हे निर्णय घेण्यात आग्रही राहणाऱ्यांमध्ये भाई हे एक होते.'' भारतातील गरीब माणसाच्या हिताची जपणूक करण्यासाठी समाजवादी विचार आवश्‍यक आहे, हे सूत्र घेऊन भाई काम करत होते आणि आजही करत आहेत. धर्माचा संकुचित विचार न करता समाजाचा व्यापक विचार करणारा नेता म्हणून भाईंकडे पाहिले जाते, असेही ते म्हणाले. 

भाई वैद्य म्हणाले, ""माझे जीवन दोन अण्णांमुळे बदलले. पहिले म्हणजे माझे वडील आणि दुसरे एस. एम. जोशी. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रत्यक्ष पाहता आणि ऐकता आले, हा माझ्या आयुष्यातील भाग्याचा क्षण आहे.'' 

शिंदेंची कोटी; पवारांची दाद 
""शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर मंत्रिपदाची एक- एक नावे समोर येऊ लागली. त्यात कोणी समाजवादी पक्षातील, कोणी कम्युनिस्ट पक्षातील, तर कोणी जनसंघातील होते. अशा मंत्रिमंडळाची सर्कस सांभाळली ती पवार यांनी. निरनिराळ्या विचारांच्या माणसांना बांधून ठेवणाऱ्या पवारांना "सर्कस बहाद्दर'च म्हटले पाहिजे,'' अशी कोटी शिंदे यांनी केली, त्याला पवार यांनीही दिलखुलास दाद दिली. 

Web Title: pune news bhai vaidya sharad pawar