वेळकाढूपणामुळे रखडले काम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जुलै 2017

भामा आसखेड प्रकल्पाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

पुणे - राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाच्या वेळकाढूपणामुळेच भामा आसखेड प्रकल्पाचे काम रखडल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. या प्रकल्पाचे काम पूर्ण करून पूर्व भागाला पुरेसा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. 

शहराच्या पूर्व भागाला म्हणजे वडगावशेरी, खराडी, चंदननगर आणि आजूबाजूच्या परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी भामा आसखेड प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. परंतु, स्थानिक शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी प्रकल्पाच्या जलवाहिनीचे काम रोखले आहे. त्यामुळे मुदत संपल्यानंतरही या प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले नाही. या पार्श्‍वभूमीवर या भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली असून, प्रकल्पाचे काम सुरू करावे, या मागणीसाठी आंदोलन केले. 

माजी आमदार बापू पठारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात नगरसेवक महेंद्र पठारे, भैयासाहेब जाधव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यात सहभागी झाले. 

बापू पठारे म्हणाले, ‘‘पूर्व भागातील रहिवाशांना पुरेसा पाणीपुरवठा झाला पाहिजे, यासाठी हा प्रकल्प आहे. मात्र, स्थानिक शेतकरी आणि प्रशासनाच्या वादात त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे हा प्रकल्प फसण्याची शक्‍यता आहे. राज्य सरकार वेळ देत नसल्याने काम सुरू होत नाही. त्यात महापालिकाही लक्ष घालत नाही. या प्रकल्पाचे काम सुरू न झाल्यास आणखी आक्रमक भूमिका घेऊ.’’

दरम्यान, या संदर्भात, महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना पठारे आणि जाधव यांनी निवेदन दिले.

Web Title: pune news bhama aaskhed project Hired work