"बायोमेट्रिक' नसल्याने कर्मचाऱ्यांची चंगळ! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

पुणे - विधानभवन येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विविध विभागांमध्ये काही अधिकारी व कर्मचारी सकाळी कार्यालयीन वेळेवर न येणे, "भोंग्या'ची वाट न पाहता वेळेअगोदर घरची वाट धरणे असे प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. "बायोमेट्रिक' यंत्रणा नसल्याने काही विभागातील अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 

पुणे स्थानक येथे जुनी इमारत पाडून पाच मजली नवीन प्रशासकीय इमारतीचे काम पूर्णत्वास येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाची विविध विभागांची कार्यालये जिल्हा परिषदेची जुनी इमारत, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आणि विधानभवन येथील विभागीय आयुक्त कार्यालयांमध्ये स्थलांतरित करण्यात आली आहेत. त्यामुळे विधानभवन येथे "बायोमेट्रिक' यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. त्याचा गैरफायदा घेत काही अधिकारी व कर्मचारी वेळेवर न येणे, संध्याकाळी सुटीचा भोंगा वाजण्यापूर्वीच घरी जाण्याचे प्रकार बिनबोभाट सुरू आहे. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यातून विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना अधिकारी व कर्मचारी "गायब' असल्याने कार्यालयातील रिकाम्या टेबल-खुर्च्यांचे दर्शन घेऊन रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याचे चित्र विधान भवन परिसरात निदर्शनास येत आहे. बायोमेट्रिक यंत्रणा नसल्याने उशिरा कार्यालयात येणाऱ्या आणि लवकर घरी पळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई कधी होणार, असा प्रश्‍न त्रस्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 

कार्यालयांमध्ये सकाळी काही अधिकारी व कर्मचारी उशिरा येतात. तसेच सायंकाळी सहा वाजण्यापूर्वी कार्यालयातून बाहेर पडत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे झाल्या आहेत. त्याची गंभीर दखल घेत कार्यालयात सकाळी वेळेत न येणाऱ्या आणि निर्धारित वेळेपूर्वी कार्यालयाबाहेर पडणाऱ्या संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल. या संदर्भात सर्व विभागप्रमुखांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
 राजेंद्र मुठे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी 

Web Title: pune news biometric machine