बिस्कीट, सिगारेटची एकत्र विक्री नकोच

जंगली महाराज रस्ता - पानटपरीवर खाद्य पदार्थ विकत घेताना विद्यार्थिनी.
जंगली महाराज रस्ता - पानटपरीवर खाद्य पदार्थ विकत घेताना विद्यार्थिनी.

पुणे - दुपारची वेळ... शिवाजीनगरचा गजबजलेला परिसर... शाळकरी मुलांसमोर सिगारेटचे झुरके ओढत थांबलेले तरुण... आणि सिगारेटमधून हवेत जाणाऱ्या धुराकडे कुतूहलाने पाहणारा शाळकरी मुलांचा घोळका.. असेच चित्र फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता अशा वेगवेगळ्या रस्त्यांवर शाळेच्या वेळेत दिसले. त्यामुळे लहान मुलांचे अन्नपदार्थ आणि तंबाखूजन्य पदार्थ एकाच ठिकाणी न विकण्याच्या आदेशाची नितांत गरज होती, हे लक्षात आले आणि त्याच्या अंमलबजावणीची आवश्‍यकता प्रकर्षाने समोर आली आहे.

चॉकलेट, गोळ्या, बिस्कीट, चिप्स असे लहान मुलांचे अन्नपदार्थ आणि तंबाखूजन्य पदार्थ यापुढे एकाच दुकानांमधून विक्री करण्यास बंदी आणण्याचा आदेश राज्याच्या अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी नुकताच दिला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पानटपऱ्या आणि छोट्या दुकान व्यावसायिकांच्या परिसरात शाळकरी मुलांची नेमकी परिस्थिती काय आहे, याची पाहणी ‘सकाळ’तर्फे करण्यात आली. त्या वेळी शहराच्या विविध भागांमध्ये दिसणारे हे सामाईक चित्र समोर आले.

मोठ्यांच्या अनुकरणातून व्यसनांना बळी
एका शाळेसमोर पानटपरी तसेच आजूबाजूला तीन ते चार टपऱ्या आहेत. यावरून दिसून आले, की पानटपरी किंवा किराणामाल विक्रेता वर्ग हा ९९ टक्के अशिक्षित आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयाचा त्यांना मागमूसदेखील नाही. मुलेदेखील शाळेच्या आवारातील पानटपऱ्यांमधून खाऊ घेतात आणि काही मुले मोठ्यांचे अनुकरण करत व्यसनांना बळी देखील पडतात.

प्रसंग १
शिवाजीनगर परिसरातील सात ते आठ टपऱ्यांसमोर शाळकरी मुलांचे टोळके दिसले. या टपऱ्यांमधून ही मुले गोळ्या, चिप्स घेत होते. त्याच वेळी इतर ग्राहक या मुलांसमोर धूम्रपान करत होते. प्रत्येक झुरक्‍याने तोंडातून आत-बाहेर होणाऱ्या धुराकडे ही मुले कुतूहलाने पाहत चिप्स खात होती.

शिवाजीनगरच्याच परिसरात असलेल्या तीन ते चार टपऱ्यांमधून मुले खाऊ घेत असताना दिसली; त्याच वेळी तंबाखू मागण्यासाठीही येथे ग्राहक येत होते. मुलांना खाऊ देण्यापूर्वी तंबाखू दिली गेली. याबाबत दुकानदाराला विचारले असता ते म्हणाले, ‘‘तंबाखू दिली तो ग्राहक लवकर पुढच्या कामाला जातो. ही मुले असतात, त्यांना घाई नसते. तसेच, त्यांच्या मागण्या सारख्या बदलत असतात.’’

प्रसंग २
शिरोळे रस्ता येथील गल्लीत मोठ्या प्रमाणावर महाविद्यालयीन विद्यार्थी धूम्रपान करताना आढळले. येथे टपऱ्यांची संख्या जास्त आहे. समोरच संभाजी उद्यान असल्यामुळे येथे लहान मुलांचा वावर असतो. त्यांचे लक्ष सिगारेटच्या धुरात हरवलेल्या तरुणाईकडे असल्याचे निरीक्षणही यातून समोर आले.

अन्नपदार्थ आणि तंबाखूजन्य पदार्थ एकाच दुकानामधून विक्री करण्यावर बंदी आणल्याची माहिती मिळाली; परंतु जवळपास शाळा नसल्याने लहान मुले येण्याचा प्रश्‍नच येत नाही. या नियमामुळे आमच्या पोटावर पाय येईल, कारण मुख्य व्यवसायातील वस्तूंना पूरक असे खाद्यपदार्थ असतात. जर त्यांची विक्री बंद केली तर उत्पन्न कमी होईल.
- अलका कोंडे देशमुख, व्यावसायिक

तंबाखूबाबतचे दोन कायदे अस्तित्वात असताना आणखी एका आदेशाची गरज नाही. आधीच्या कायद्याचीच काटेकोर अंमलबजावणी होत नाही, म्हणून दुसरा कायदा लागू केला जात आहे. गुटख्यातून समाजाचे मोठे नुकसान होते, त्यामुळे अनेकांनी गुटखा विक्रीवर कायद्याने बंदी येण्यापूर्वी स्वतःहून गुटख्याची विक्री थांबवली होती. आता ही तंबाखू आणि खाद्यपदार्थांची स्वतंत्र विक्री हा या व्यावसायिकांवर अन्याय आहे.
- हेमंत शाह, तांत्रिक सल्लागार, महाराष्ट्र पान व्यापारी महासंघ

तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर कायद्याने बंदी घालून मुलांमधील व्यसनाधीनता कमी होणार नसली तरीही त्याला निश्‍चित प्रतिबंध मिळेल. व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी कायद्याच्या बरोबरीने त्याची भीषणता विद्यार्थ्यांना शास्त्रीय पद्धतीने सांगणे गरजेचे आहे. तसेच, तंबाखूजन्य पदार्थांवर सर्वंकष बंदी असली पाहिजे.
- चंद्रकांत मोहोळ, अध्यक्ष, पुणे शहर मुख्याध्यापक संघ

(संकलन - योगिराज प्रभुणे, ऋतुजा हगवणे, नीलम कराळे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com