एका बूथमध्ये हवेत 25 कार्यकर्ते! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

पुणे - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतही विजय मिळविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली असून, एका बूथमधून 25 सक्रिय कार्यकर्ते निर्माण करण्याचा कानमंत्र बूथप्रमुखांना पक्षाने दिला आहे. त्यासाठी पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. 

पुणे - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतही विजय मिळविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली असून, एका बूथमधून 25 सक्रिय कार्यकर्ते निर्माण करण्याचा कानमंत्र बूथप्रमुखांना पक्षाने दिला आहे. त्यासाठी पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. 

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या तीन प्रभागांमधील कार्यकर्त्यांच्या एकत्रीकरणाद्वारे या बैठकांना रविवारपासून प्रारंभ झाला. एका बैठकीत प्रत्येकी तीन प्रभागांमधील बूथप्रमुख आणि संबंधित नगरसेवकांशी संवाद साधण्यात येत आहे. पहिल्या बैठकीस पालकमंत्री गिरीश बापट पूर्णवेळ उपस्थित होते. तर, शहराध्यक्ष योगेश गोगावले हे बैठकांचे संचालन करीत आहेत. एक हजार मतदारांमागे पक्षाची यंत्रणा, हे भाजपचे वैशिष्ट्य समजले जाते. नव्या रचनेत एका बूथची जबाबदारी एका कार्यकर्त्यावर देण्यात आली आहे. त्याने त्याच्याकडे सोपविण्यात आलेल्या बूथ यादीतील नावांमधून किमान 25 सक्रिय कार्यकर्ते निर्माण करायचे आहेत. त्यांचा पूर्ण तपशील पक्षाच्या शहर कार्यालयात लेखी सादर करायचा आहे. तसेच, पक्षाने भाजपचे एक ऍप संबंधित कार्यकर्त्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करण्याचा आदेश दिला आहे. त्यात त्या 25 कार्यकर्त्यांचा तपशील छायाचित्रासह नोंदवून मुंबईत प्रदेशच्या वॉर रूमला पाठवायचा आहे. त्या तपशिलाची अचानक पडताळणीही पक्ष करणार आहे. 

परिसरात होणारे विविध जाती-धर्मांचे सण, मेळावे, कार्यक्रम आदींमधील सक्रिय कार्यकर्ते, परिसरातील प्रमुख मंडळांमधील सक्रिय कार्यकर्त्यांची माहिती, जाती-धर्माच्या संस्था, भाजपच्या सहानुभूतीदार व्यक्ती व संस्था आदींचेही तपशील गोळा करण्यास पक्षाने बूथप्रमुखांना सांगितले आहे. प्रत्येक बूथप्रमुखाने किमान 10 कुटुंबांशी संपर्क वाढविण्याचा आदेशही पक्षाने दिला आहे. 

पक्षाचा झेंडा घरावर हवा 
शहर, गाव, चौकात, वेशीवर भाजपची पाटी लावण्यात यावी, तर बूथप्रमुखाने घराच्या दरवाजावर नावाचा फलक लावून सक्रिय कार्यकर्त्यांच्या घरावर पक्षाचा झेंडा लावावा, अशीही सूचना पक्षाने कार्यकर्त्यांना केली आहे. 

Web Title: pune news BJP