भाजपची राष्ट्रवादीवर कुरघोडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

किशोर धनकवडे यांचे नगरसेवकपद रद्द; मग किरण जठार यांचे का नाही?

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक किशोर ऊर्फ बाळू धनकवडे यांचे नगरसेवकपद रद्द करून भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडी केल्याची चर्चा महापालिकेच्या राजकीय वर्तुळात आहे. तोच निकष सत्तारूढ भाजपच्या नगरसेविका किरण जठार यांना का लावण्यात आला नाही, असाही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

किशोर धनकवडे यांचे नगरसेवकपद रद्द; मग किरण जठार यांचे का नाही?

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक किशोर ऊर्फ बाळू धनकवडे यांचे नगरसेवकपद रद्द करून भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडी केल्याची चर्चा महापालिकेच्या राजकीय वर्तुळात आहे. तोच निकष सत्तारूढ भाजपच्या नगरसेविका किरण जठार यांना का लावण्यात आला नाही, असाही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

महापालिकेच्या गेल्या कार्यकाळात नगरसेवकांचे जात पडताळणी प्रमाणपत्र उमेदवारी अर्ज सादर करतानाच द्यायचे होते. परंतु यंदा त्यात बदल झाला आहे. उमेदवाराने जातीचा दाखला दिल्यावर निवडून आल्यानंतर सहा महिन्यांत वैध पडताळणी प्रमाणपत्र सादर करायचे होते. परंतु त्यानुसार धनकवडे यांच्याकडे अजून दोन महिन्यांची मुदत होती. तसेच त्यांच्या जातीच्या दाखल्याबाबत उच्च न्यायालयात दहा जुलै रोजी सुनावणी होती. या सुनावणीचा निकाल लागल्यावर धनकवडे यांच्या नगरसेवकपदाबाबतचा निर्णय घ्यावा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसकडून आयुक्त कुणाल कुमार यांना करण्यात आली होती. परंतु सहा दिवस अगोदरच आयुक्तांनी प्रशासनाच्या प्रस्तावावरून धनकवडे यांचे नगरसेवकपद रद्द केले. धनकवडे यांच्या विरोधात भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांचे पुतणे अभिषेक हे उभे होते. त्यांचा सुमारे सात हजार मतांनी पराभव झाला होता. धनकवडे यांच्याबाबत आयुक्तांनी तत्परतेने निर्णय घेताना भाजपच्या नगरसेविका किरण जठार यांचे जातीचे प्रमाणपत्र बनावट असल्यामुळे त्या बाबत गुन्हा दाखल करण्याचा निर्णय संबंधित अधिकाऱ्यांनी दिला होता. त्याबाबत मात्र आयुक्तांनी कारवाई केलेली नाही. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचा शहर, जिल्हा आणि पिंपरी- चिंचवडचा पाच जुलै रोजी मेळावा होता. त्याचे औचित्य साधत आयुक्तांनी चार जुलै रोजीच धनकवडे यांचे नगरसेवकपद रद्द करून राष्ट्रवादीला दणका दिला. भाजपच्या काही नेत्यांनी यासाठी पुढाकार घेतल्याचीही चर्चा आहे. 

महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी भाजपच्या दबावाखाली धनकवडे यांचे नगरसेवकपद रद्द केल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे. त्याच वेळी किरण जठार यांच्यावरील कारवाई मात्र हेतूतः टाळली आहे. त्यामुळे आयुक्त भाजपच्या दबावाखाली काम करीत असल्याचे दिसून येत आहे. 
- चेतन तुपे, विरोधी पक्षनेते

भाजपने आयुक्तांवर दबाव आणल्याची चर्चा निराधार आहे. महापालिकेत निवडून आलेले १६२ नगरसेवक भाजपसाठी समान आहेत. धनकवडे यांच्याबाबतचा निर्णय आयुक्तांनी कायद्याप्रमाणे आणि त्यांच्या अधिकारात घेतला आहे. जठार यांच्याबाबतही कायद्यातील तरतुदींनुसारच निर्णय होईल. 
- श्रीनाथ भिमाले, सभागृहनेते

Web Title: pune news bjp comment on ncp