अजेंड्यात तडजोड नाही ! 

अजेंड्यात तडजोड नाही ! 

पुणे - महापालिकेच्या उत्पन्नात कोट्यवधीची तूट होऊन, विकासकामे रोखली जाण्याची भीती असली, तरी सत्तास्थान ताब्यात घेतल्यानंतर आपला अजेंडा म्हणून अर्थसंकल्पात मांडलेल्या योजनांना धक्का लागणार नाही, याची विशेष काळजी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी घेत आहेत. परिणामी, पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी ज्येष्ठ नागरिक मोफत आरोग्य तपासणी योजना अशा तब्बल 100 कोटी रुपयांच्या योजना परिणामकारकरीत्या राबविण्यात येणार आहेत. काही महत्त्वाच्या प्रकल्पांना प्राधान्य देण्याचे पक्षाचे धोरण आहे. 

महापालिकेत स्वबळावर सत्ता स्थापन केलेल्या भाजपने पहिलावहिला अर्थसंकल्प (2017-18) सुमारे पाच हजार 912 कोटी रुपयांचा मांडला आहे. मात्र, महापालिकेच्या उत्पन्नात घट होण्याची शक्‍यता निर्माण झाली असतानाही अर्थसंकल्पाची मोडतोड करणार नसल्याची भूमिका स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी घेतली आहे. परंतु, चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यांच्या उत्पन्नाचा नुकताच आढावा घेण्यात आला. त्यात, अर्थसंकल्पाच्या तुलनेत महापालिकेला मार्चअखेर केवळ चार हजार 200 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याचे आढाव्यावरून दिसून आले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात महापालिकेला तब्बल एक हजार 700 कोटी रुपयांची तूट येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एवढ्याच रकमेची विकासकामे रोखली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, विकासकामांवर परिणाम होऊ नये, याकरिता प्रशासनाने उत्पन्नवाढीवर भर देण्याचा सल्ला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला होता. त्यावर प्रस्तावित योजना, खर्च आणि उत्पन्नाचा सोमवारी मोहोळ यांनी पुन्हा आढावा घेतला. महापौर मुक्ता टिळक, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. 

उत्पन्नात घट होत असल्याने नगरसेवकांनी सुचविलेल्या कामांना कात्री लावण्याची चर्चा आहे. मात्र, पक्ष म्हणून आणलेल्या योजनांची पूर्णपणे अंमलबजावणी करण्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. त्यात, दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने आखलेली पुणेकरांना पाच लाख रुपयांचा अपघात विमा देण्याची योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यापाठोपाठ डॉ. मुखर्जी यांच्या नावाची ज्येष्ठांची आरोग्य योजनाही भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. वाजपेयी यांच्या नावाने सुरू करण्यात येणारे वैद्यकीय महाविद्यालय या प्रमुख योजनांचा समावेश आहे. शिवाय, नर्सिंग कॉलेज, प्रायोगिक रंगभूमीसाठी नाट्यगृह आणि बालभारती ते पौडफाटा रस्त्यासह अन्य काही महत्त्वाच्या योजना पूर्ण करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले. 

शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी अनेक महत्त्वाच्या योजना आखल्या असून, त्यांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाबरोबर पुन्हा चर्चा झाली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातील (2018) सर्व योजनांची कामे होतील. निधीची कमतरता भासणार नाही. 
- मुरलीधर मोहोळ, अध्यक्ष, स्थायी समिती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com