आता झिरपणारे ‘ब्लॉक’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

पाणी साचणाऱ्या रस्त्यांवर महापालिकेचे नियोजन
पुणे - पावसाळ्यात रस्त्यावर साचणारे पाणी जमिनीत झिरपण्याच्या उद्देशाने आता रस्त्यालगत ‘पोरस ब्लॉक’ बसविण्याचा प्रयोग महापालिका प्रशासन करणार आहे. या ‘ब्लॉक’मुळे पाणी जमिनीत झिरपत असल्याचे प्राथमिक चाचण्यांतून स्पष्ट झाले आहे. वर्दळीच्या आणि प्रमुख मात्र, ज्या रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्‍यता आहे, अशा रस्त्यालगत प्राधान्याने हे ब्लॉक बसविले जाणार आहेत. त्याकरिता, रस्त्यालगतची रचनाही बदलण्यात येणार आहे. तळजाई पठारावर हे ब्लॉक बसविले असून, तो प्रयोग यशस्वी होत असल्याचे दिसून आले आहे. 

शहराच्या विविध भागातील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची पाहणी करून पोरस ब्लॉक बसविण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाच्या पातळीवर सुरू आहे. पुढील महिनाभरात किमान दोन रस्त्यालगत हे ब्लॉक बसविण्याचे प्रयत्न आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शहर आणि परिसरात सुमारे दोन हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यात, पाचशेहून अधिक किलोमीटर लांबीच्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांचाही समावेश आहे. मात्र, रस्त्यांची बांधणी करताना, जुन्या आणि नव्या रस्त्यांवर सखल भाग असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांवर पाण्याची डबकी साचतात. तासन्‌तास रस्त्यावर पाणी साचत असल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो. त्यामुळे वाहतूक कोंडी होते आणि अपघाताच्या घटनाही घडतात. त्यामुळे रस्त्यांच्या बांधणीबाबत प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर पावसाळ्यात ज्या ठिकाणी पाणी साचते, ते झिरपण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या ‘पोरस ब्लॉक’चा पर्याय निवडण्यात आला आहे. 

महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत म्हणाले, ‘‘साचलेले पाणी जमिनीत झिरपावे, यासाठी पोरस ब्लॉकचा प्रयोग करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर ते बसविले आहेत. त्याच्या तपासण्या सुरू आहेत. ब्लॉक बसविण्याचे नियोजन प्राथमिक टप्प्यात आहे. ते अधिकाधिक उपयुक्त ठरावेत, याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी ब्लॉक बसविताना, रस्त्यालगतची रचना बदलण्याचा प्रयत्न असेल.’’

सिमेंट काँक्रीटऐवजी खडीचा वापर
सध्या रस्त्यालगत सिमेंट ब्लॉक बसविले आहेत. संपूर्ण रस्ता खोदण्यापेक्षा रस्त्यालगतच्या भागाची खोदाई करता यावी हा सिमेंट ब्लॉक बसविण्यामागचा उद्देश आहे. मात्र, या ब्लॉकच्या खाली, सिमेंट काँक्रीट असल्याने पाणी झिरपत नाही. परंतु, पोरस ब्लॉक बसविताना त्याच्या खाली केवळ खडीचा वापर करण्यात येणार आहे. ज्यामुळे ब्लॉकमधून पाणी सहज झिरपू शकेल.

Web Title: pune news block of water proliferate